Ajit Pawar Death : अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राने एक उमदा आणि स्पष्टवक्ता नेता गमावला अशा शब्दांत भावूक श्रद्धांजली वाहिली आहे.

Ajit Pawar Death : अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट
raj thackeray ajit pawar
| Updated on: Jan 28, 2026 | 1:48 PM

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. मुंबईहून बारामतीच्या दिशेने जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान लँडिंगदरम्यान शेतात कोसळून हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित दादांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तसेच आता सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, अजित पवार यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण सुरु केले आहे. त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली होती.

राज ठाकरे यांची संपूर्ण पोस्ट

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.

१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.

प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.

अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.

अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशासनावर असलेली त्यांची जरब, विकासाची दृष्टी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते जनसामान्यांत लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा शिल्पकार आज काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण राज्यातून शोक व्यक्त केला जात आहे.