अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आव्हाडांकडून मोठा संशय व्यक्त

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. ब्लॅक बॉक्स जळण्यावरून आणि विमानाला असलेल्या परवानगीवरून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आव्हाडांकडून मोठा संशय व्यक्त
jitendra awhad ajit pawar
| Updated on: Feb 23, 2026 | 12:35 PM

महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघात की घातपात अशी शंका अनेकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका व्यक्त केली आहे.

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अजित पवारांच्या विमान अपघातांच्या मुद्द्यावर गाजणार आहे. आता याच मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने ५००० तासापेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान ८ हजारपेक्षा जास्त उडून झालं होतं, असा धक्कादायक खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केला.

मला या अपघाताबद्दल सर्वात आश्चर्य वाटतंय ते म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी असतो, तो विमानाचा भाग जशाच्या तसा होता. ब्लॅक बॉक्स ज्या गोष्टीपासून बनवले गेले, ते मटेरिअल आहे टायटेनिअम. म्हणजे ११ हजार सेल्सिअसच्या आगीतही त्या ब्लॅक बॉक्सला काहीही होऊ शकत नाही. त्यावेळी सरळ सांगितलं जातं की ब्लॅक बॉक्स जळून गेला. माझ्यासारख्या माणसाला तर याबद्दल नक्कीच शंका येईल. त्यामुळे रोहित पवार हे जी मागणी करतात त्यात तथ्य आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका

कंपनी कोणाची, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, विमान किती तास उडलं होतं, त्याला इतके तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, DGCA काही कव्हर करायला बघतंय का, DGCA अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत. ही कंपनी कोणाच्या अधिपत्याखाली चालते, हे सर्व प्रश्न आता समोर आले आहेत. जेवढी चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढा संशयाला वाव मिळेल. ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातील कोणत्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, असं कधीही सांगितलेले नाही, असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेला

माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असते. ब्लॅक बॉक्स जिथे असतो, तो विमानाचा भाग जशाच्या तसा तिथे होता. रोहित पवार जी काही चौकशी करत आहेत, ते अतिशय योग्य आहे. ते बरचं संशोधन करतात. त्या माध्यमातून त्या विमानाची बरीच माहिती काढली आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने ५००० तासापेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान ८ हजारपेक्षा जास्त उडून झालं होतं. यात एका माणसाचा जीव गेला. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेला, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Follow Us