Ajit Pawar | आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू, सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं उघडण्याचा अधिकार, योगींच्या निर्णयावर दादांचा पलटवार

| Updated on: May 12, 2022 | 11:59 AM

कुणी कुठं कार्यालय काढावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू. सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं काढण्याचा अधिकार आहे, असा पलटवार अजित पवार यांनी केला

Ajit Pawar | आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू, सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं उघडण्याचा अधिकार, योगींच्या निर्णयावर दादांचा पलटवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रात मुंबईत यूपी सरकारचं कार्यालय उभारण्याची घोषणा केली, त्यानंतर यामागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत, यासंबंधीचे तर्क वितर्क काढले जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला यापासून काय धोका आहे, याचाही अंदाज बांधला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावत यात काहीही घाबरण्यासारखे कारण नाही. कुणी कुठं कार्यालय काढावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू. सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं काढण्याचा अधिकार आहे, असा पलटवार अजित पवार यांनी केला. मुंबईत आज पत्रकारांशी ते बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातले अनेक पर्यटक युपीत जात असतात, त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारदेखील तेथे कार्यालय सुरु करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

योगींच्या कार्यालयावर काय म्हणाले अजित पवार?

युपी सरकारच्या कार्यालयाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कुणी कुठं कार्यालय काढावं हा ज्याचा त्याचा अधिकार. दिल्लीत महाऱाष्ट्र सदन आहे. नवी मुंबईतही वेगवेगळी सदनं आहेत. त्याला विरोध आम्ही करणार नाहीत. आम्हीही उत्तर प्रदेशात कार्यालय काढू शकतो. गैरसमज आणि घाबरण्याचं कारण नाही. आपल्या भारतात कुठंही कुणालाही कार्यालयं काढता येतात.’

‘राजद्रोह-कोर्टाच्या सूचनांचं पालन होईल’

नवनीत राणा-रवी राणा यांच्याविरोधात ठाकरे सरकारने राजद्रोहाचं कलम लावलं आहे. मात्र हे कलमच सुप्रीम कोर्टानं निरस्त केल्यामुळे कोर्टाच्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, अजित पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ राजद्रोहाचं कलम सुप्रीम कोर्टानं काही सूचना केंद्र सरकारला केल्या. कलमाचा वापर करू नये, असं सांगण्यात आलं आहे. घटनेत, कायद्यात वेगवेगळ्या यंत्रणांना अधिकार दिला आहे. त्यानुसार, कोर्टाच्या सूचनांचं आपण पालन करत असतो. राज्यांनाही तशा सूचना मिळतील. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

निवडणुकांत आघाडी होणार का?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना सांगितलं की,’ नानांचं ते स्टेटमेट हास्यास्पद. कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते माहिती आहे. भाजपातून आले. भाजपने तसं म्हणायचं काय़.. हेडलाइन मिळवण्याकरिता हे वाक्य असेल. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. राज्य स्तरावर, देशस्तरावर निर्णय घेत असताना त्या स्तरावरील नेते घेतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना घडत असतात. तिथली स्थिती पाहता सर्वच पक्ष वेगवेगळे निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांतील आघाडीबाबत शरद पवार यांनी राज्यस्तरावर बैठक घेतली होती. स्थानिक स्तरावर आघाडी ठेवायची आहे, मात्र जिल्हा स्तरावर तिथले संपर्कमंत्री, आजी माजी खासदार त्याबद्दलचा निर्णय घेतील, असा निर्णय झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.