
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले आहे. याचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांचे समर्थक कोण विजयी होणार याचा अंदाज बांधताना दिसत आहेत. अकलूज नगरपालिकेसाठीही मतदान पार पडले आहे. आता नगराध्यक्षपदासाठी दोन मित्रांमध्ये पैज लागली आहे. जो मित्र पैज जिंकेल त्याला मोठा इमाम मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी जोमाने प्रचार केला, त्यानंतर 2 डिसेंबरला मतदान पार पडले. या मतदानानंतर आता उमेदवारांना आणी कार्यकर्त्यांना निकालाचे वेध लागले आहेत. अनेक ठिकाणी पैजा लावल्या जात आहेत. अकलूज नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी देखील दोन मित्रांनी चक्क बुलेटची पैज लावली आहे. जो मित्र जिंकेल त्याला ही बुलट मिळणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विजयसिंह मोहिते यांच्या अकलूजमध्ये भाजपने विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे अकलूजच्या निवडणुकीडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता मोहिते पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावल्या जात असल्याचे समोर आले आहे. मोहिते पाटील समर्थक मच्छिंद्र कर्णवर आणि भाजप कार्यकर्ता दादा तरंगे यांनी बुलेटची पैज लावली आहे. 21 डिसेंबरच्या निकाला नंतर कोण पैज जिंकणार याचीच चर्चा सुरू झाली आहे. बुलेटच्या पैजेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते पैज लावत असल्याचे दिसत आहे. मच्छिंद्र कर्णवर यांनी दावा केला आहे की, तुतारीचा नगराध्यक्ष होणार तर, दादा तरंगे यांनी कमळाचा नगराध्यक्ष होणार असल्याचे विधान केले आहे. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना विजयानंतर बुलेट देण्याचे आश्वासन दिले आहे. या दोघांनीही विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता ही मानाची बुलेट कोण जिंकणार याबाबत अकलूजकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.