एक गोष्ट घडली अन् कुटुंबावर टाकला बहिष्कार, चार वर्षापासून वाळीत, अख्खं गावच अंधश्रद्धेच्या विळख्यात, काय घडलं?

अलिबागमध्ये अंधश्रद्धेतून एका कुटुंबाला मांत्रिकाच्या सांगण्यावरून चार वर्षांपासून वाळीत टाकल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर 'देवदेवस्की'चा आरोप करत गावकऱ्यांनी कुटुंबावर ६० हजार दंड ठोठावला. दंड न भरल्याने त्यांना बहिष्कृत करण्यात आले. अखेर पीडित कुटुंबाने तक्रार केल्यावर रेवदंडा पोलिसांनी ३३ जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एक गोष्ट घडली अन् कुटुंबावर टाकला बहिष्कार, चार वर्षापासून वाळीत, अख्खं गावच अंधश्रद्धेच्या विळख्यात, काय घडलं?
कुटुंब चार वर्षापासून वाळीत
| Updated on: Oct 14, 2025 | 10:25 AM

21 वं शतक उजाडलं, दुनिया एवढी पुढे जात्ये, रोज नवनवे शोध लागतायत, जग विस्तारतयं तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही अंधश्रद्धेचं काळं सावट घोंगावताना दिसतंय. त्या अंधाराखाली अनेकांचं फरपट होत्ये. त्याचंच ज्वलंत उदाहरण अलिबाग तालुक्यात पाहायला मिळालं. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी एका कुटुंबावर ‘देवदेवस्की’चा ठपका ठेवत चार वर्षांपासून वाळीत टाकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी तब्बल ३३ जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आह.

नेमकं काय आहे प्रकरण ?

अलिबाग तालुक्यातील रामराज खैरवाडी गावात धर्मा दामू गडखळ यांचा मुलगा आजारी पडला आणि 2019 साली त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर पाटवाडी गावातील मांत्रिक लहू आणि मधु गडखळ यांच्या सांगण्यावरून गावातील तुकाराम दरोडा यांच्यावर ‘देवदेवस्की’चा आरोप लावण्यात आला.

त्यानंतर 16 सप्टेंबर 2021 साली गावकीची बैठकीत झाली. त्या बैठकीमध्ये पंच व ग्रामस्थांनी दरोडा कुटुंबावर 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र त्या कुटुंबाने हा दंड भरण्यास नकार दिल्याने, अख्ख्या गावाने ठराव करून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं. एवढंच नाही तर कोणी त्यांच्याशी बोललं , तर प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, तसेच याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून हे संपूर्ण कुटुंब वाळीत टाकलं असून कोणीच त्यांच्याशी बोलत नाही, काहीही संपर्क कोणीच साधत नाही.

2021 पासून, तब्बल चार वर्षांपासून सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या दरोडा कुटुंबाने अखेर रेवदंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी संपूर् प्रकार पोलिसांना सांगितला. त्या तक्रारीवरून पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम 2016 अंतर्गत 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.