Aurangabad | पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी!

| Updated on: Jan 23, 2022 | 2:07 PM

चंद्रकांत खैरे म्हणाले की, एमआयएमने दंगली घडविल्या. शहरात लुटालूट सुरू आहे. एमआयएमचे अनेक नगरसेवक व नेते पक्ष सोडून जात आहेत. यांची नौटंकी सुरू आहे.

Aurangabad | पुतळ्यावरून पुन्हा एकदा एमआयएम-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी!
चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील.
Follow us on

औरंगाबादः एकीकडे औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भवदिव्य पुतळा (Shivaji Statue) उभारला जातोय. दुसरीकडे शहरातील सुप्रसिद्ध अशा कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची तयारी सुरूय. मात्र, या पुतळा उभारणीवरून ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत जुंपली आहे. आमचा पुतळ्याला विरोध नाही. मात्र, महाराजांचे नाव घेऊन राजकारणासाठी रक्त का आटवता, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiaz Jaleel) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना केला आहे. तर खैरे यांनी एमआयएमने दंगली घडविल्या. शहरात लुटालूट सुरू आहे, असा गंभीर आरोप केला आहे. येणाऱ्या काळात औरंगाबाद महापालिका निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर पुतळ्यावरून पेटलेले राजकारण तापण्याची शक्यता आहे.

वाद कसा सुरू झाला?

गेल्या महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप पुतळा उभारण्याचा कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. त्या बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी त्यास विरोध केला होता. याच निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार जलील यांनी नुकतेच या आशयाचे लेखी पत्र पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून काही साध्य होणार नाही, महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळा हाच असेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

जलील काय म्हणतात?

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, लोकवर्गणीतून पुतळा उभारावा. त्यासाठी आमची काहीही हरकत नाही. महाराणा प्रताप आमचे देखील आहेत. कोण म्हणते कोणी सांगितले की, महाराणा प्रताप फक्त हिंदूंचेंच होते. जालना रोडवर 400 बेडचे रुग्णालय होत आहे. त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्या. माझा पुतळ्याला विरोध नाही. आमच्या मनातही महाराणा प्रतापांबद्दल खूप आदर आहे. तुम्ही फक्त शिवाजी महाराज म्हणून राजकारणासाठी रक्त आटवता, असा टोला त्यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता हाणला आहे. जलील यांच्या या टीकेचा खैरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

खैरेंच प्रत्युत्तर

चंद्रकांत खैरे म्हणाले की, एमआयएमने दंगली घडविल्या. शहरात लुटालूट सुरू आहे. एमआयएमचे अनेक नगरसेवक व नेते पक्ष सोडून जात आहेत. यांची नौटंकी सुरू आहे. पुतळ्यासाठीही निधी देतो म्हणतात. मात्र, 5 लाख व 10 लाख आले कुठून. तुम्ही खंडणी गोळा करून पैसे देणार. असे तुमचे खंडणी वसूल केलेले पैसे आम्हाला नको. आम्ही पैसे देऊ, असा सल्लाही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, मतदार संघात फिरा. आम्ही करतोय करत राहणार. आता मैदानात या. सर्व मुस्लिम आत्ता बोलतायत. साहेब तुम्ही चांगले होते. हे आम्हाला हाकलून देतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुम्ही युपीएचे नाही किंवा एनडीएचे नाहीत. राष्ट्र पुरूषांचे पुतळे, त्यांना मानणारा मोठा वर्ग. तुमचे काळे पैसे आम्हाला नको. आम्ही सक्षम आहोत. आम्ही लवकरात लवकर पुतळा उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इतर बातम्याः

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वारी आज औरंगाबादेत धडकणार, 10 फेब्रुवारी रोजी अनावरण, तयारी वेगात!

Samruddhi Highway| मराठवाड्यात समृद्धी महामार्गात अडथळा, नांदेड ते जालना रस्त्याविरोधात हायकोर्टात आव्हान!