तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, दहशतवादी सरकारला…; अमित ठाकरे कडाडले
Amit Thackeray : मुंबईतील आंदोलनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी अमित ठाकरे यांनी आदोलकांचे कौतुक केले आहे.

मुंबईतील दादरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. यावेळी अमित ठाकरे यांनी या आंदोलकांचे कौतुक केले आहे. तुमची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही जे करताय ते उत्तम आहे असं म्हणत आंदोलकाची पाठ थोपटली आहे. अमित ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
दहशतवादी सरकारला…
दादरमधील आंदोलनावेळी अमित ठाकरे यांनी म्हटले की, तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसत आहे. आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आहोत आता. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आम्ही आज इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही. तुमच्यावर केसेस होणार नाही. तुम्ही जे करताय ते उत्तम आहे. देश पेटून उठलाय तुमच्यामुळे. खुप उत्तम सुरू आहे, सरकार बॅकफूटवर गेलं आहे. अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरूण तरूणी आहेत. त्याच्यामुळे मी इकडे जास्त बोलायला आलेलो नाही. मी फक्त अनुभवायला आलो आहे. तुम्हाला कुणाला बोलायचं असेल तर काही लोकांनी स्टेजवर यावं आणि बोलावं. तुमचं आंदोलन उत्तम सुरू आहे. मी खाली उतरून तुमच्यात उभा राहणार आहे. मी लोकांमध्ये उभे राहून राष्ट्रगीत म्हणणार आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही आता जिथे-जिथे आंदोलन करायचं तिथे आंदोलन करू शकता. तुम्हाला कोणी हात लावणार नाही. लाठी खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? पेपर लीक झाल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? संविधानावर अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? हिंदू मुस्लिम करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? संकटाच्या काळात जे परदेशात जातात त्यांचे मित्र बनू शकता का? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तुम्ही शांत बसणार आहात का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना करत प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत माघार न घेण्याचे आवाहन केले आहे.