
सध्या राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. आज आगामी नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा सुपर संडे आहे. सध्या ठिकठिकाणी अनेक नेतेमंडळींच्या प्रचारसभा रंगताना दिसत आहेत. त्यातच आता युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी नवनीत राणा यांचा झालेल्या पराभवाबद्दलची खंत बोलून दाखवली.
आमदार रवी राणा यांची अमरावतीत नुकतीच एक प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी नवनीत राणा यांचा झालेला पराभव, विद्यमान खासदारांची कार्यशैली आणि स्थानिक आमदारांचा विकासकामांचा अनुभव या मुद्द्यांवरून रवी राणा यांनी ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.
नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता, पत्ता नाही. विकासाचा पत्ता नाही आहे, काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला, अशा शब्दात रवी राणा यांनी टोला लगावला.
निवडून आलेल्या आमदाराने एका वर्षात काय केले? विकास कसा करायचा हे सांगण्यासाठी या आमदाराला माझ्याकडे पाठवा, मी त्या आमदाराची ट्युशन घेतो, असा सल्ला देत नवनीत राणा यांनी आमदार गजानन लवटे यांना आव्हान दिले. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात आमदार रवी राणा यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश गायगोले यांना स्वतः रवी राणा यांनीच भाजपची उमेदवारी दिली, असा खुलास त्यांनी केला.
यावेळी रवी राणा यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, पाना चिन्हावरील सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. ते निवडून आले म्हणजे रवी राणा निवडून आला असं समजा. दर्यापूरमध्ये लाडक्या बहिणीचा पगार नवनीत राणांनी सुरू केला, असेही रवी राणांनी म्हटले. दरम्यान सध्या अमरावतीतील राजकीय वातावरण अधिक तापल्याचे पाहायला मिळत आहे.