सत्तेसाठी कायपण! भाजप-MIM पुन्हा एकत्र, महापौरपदासाठी थेट पाठिंबा; नेमकं काय घडलं?

अमरावती महापालिकेत भाजपने एमआयएमच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी निवड झाली असून या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा येथे वाचा.

सत्तेसाठी कायपण! भाजप-MIM पुन्हा एकत्र, महापौरपदासाठी थेट पाठिंबा; नेमकं काय घडलं?
bjp mim
| Updated on: Feb 06, 2026 | 3:45 PM

अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौरपदाची निवडीचा कार्यक्रम पार पडला. यात भारतीय जनता पक्षाचे श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाजपच्या उमेदवाराला MIM (एमआयएम) च्या नगरसेविकेने पाठिंबा दिला.

नेमके काय घडले?

अमरावती महापालिकेच्या ८७ जागांसाठी झालेल्या या राजकीय लढाईत महायुतीचे भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट आणि युवा स्वाभिमानचे वर्चस्व आधीच दिसत होते. मात्र, प्रत्यक्ष सभागृहात काही वेगळीच दृश्ये पाहायला मिळाली. बडनेरा येथील एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपचे महापौर उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना मतदान केले. त्यानंतर उपमहापौर पदासाठीही त्यांनी युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडे यांना पाठिंबा दिला. भाजप आणि एमआयएम हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे या पाठिंब्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी भाजपचे नगरसेवक आशिष अतकरे आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये सभागृहात गुप्तगू चर्चा झाली. तसेच काही नगरसेवकांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. या घडामोडींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

महापौरपदासाठी फॉर्म्युला काय?

महायुतीमध्ये ठरलेल्या सूत्रानुसार, पहिल्या सव्वा वर्षासाठी श्रीचंद तेजवानी महापौर म्हणून काम पाहतील. त्यानंतर उर्वरित काळासाठी आशिष अतकरे यांना महापौर पदाची संधी दिली जाणार आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेस या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत कमकुवत दिसून आली. महायुतीकडे असलेले स्पष्ट बहुमत पाहून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये निरुत्साह होता. काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार संजय शिरभाते आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार लुधना तनवीर यांचा पराभव झाला. मतदानादरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सभागृहात जाण्याऐवजी विरोधी पक्षनेत्याच्या दालनात बसून होते.

तसेच मतदानापूर्वी आमदार रवी राणा आणि १५ नगरसेवकांनी अंबादेवीची महाआरती करून विजयाचा संकल्प केला होता. त्यासोतबच सभागृहात महायुतीचे नगरसेवक भगव्या फेट्यात तर एमआयएमचे नगरसेवक हिरव्या फेट्यात अवतरले होते. आता ही प्रशासकीय राजवट संपून तब्बल चार वर्षांनंतर अमरावतीला लोकनियुक्त महापौर मिळाला आहे.