परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी थार कारचा मालक सापडला, सायबर तज्ज्ञांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अयान अहमदकडून दोन पिस्तूल आणि रिल्ससाठी वापरलेली थार गाडी जप्त केली असून, डिजिटल पुराव्यांसाठी लॅपटॉप आणि हार्डडिस्क जप्त करण्यात आली आहे.

परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. यानंतर आता अमरावती ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी आता भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसत आहेत.
गाडीच्या मालकाची माहिती समोर
या घटनेतील मुख्य आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी आणि मुलींना इम्पेस करण्यासाठी महागड्या गाड्या आणि शस्त्रांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नुकतीच अयानने रिल्स बनवण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची महिंद्रा थार गाडी जप्त केली आहे. ही गाडी सावळी येथील राजेश प्रजापती यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अयान ही गाडी कशाप्रकारे वापरत होता याचा तपास सुरू आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी आरोपींच्या अड्ड्यावरून दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत. हे शस्त्र आरोपींकडे कुठून आले आणि याचा वापर मुलींना धमकावण्यासाठी केला जात होता का, या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत.
मोठा साठा जप्त
या प्रकरणातील दुसरा आरोपी एहफाज खान याच्याकडून पोलिसांनी तांत्रिक माहितीने मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये एक उच्च क्षमतेचा लॅपटॉप, टॅबलेट (Tab), हार्डडिस्क आणि मेमरी कार्ड्स जप्त केले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, या हार्डडिस्कमध्ये अनेक पीडित मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स असण्याची शक्यता आहे. हे रॅकेट केवळ अमरावती जिल्ह्यापुरते मर्यादित नसून याचे धागेदोरे इतर शहरांशी जुळलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील कारवाई
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही मुख्य आरोपींची पोलीस कोठडी आज संपत आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा प्रोग्रेस रिपोर्ट आज अचलपूर न्यायालयात सादर केला जाईल. आरोपींनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पोलीस अधिक तपासासाठी त्यांच्या कोठडीची मुदत वाढवून मागण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
