
MP Anil Bonde : अमरावतीत तीन दिवसांपूर्वी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याचे प्रकरण समोर आले होते. या बॅनर विरोधात आवाज उठवल्या नंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांना धमकी वजा इशारा देणारा ई-मेल हैदराबादमधून आला आहे.बोंडे यांच्या कार्यालयाकडून अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काल रात्री अनिल बोंडे यांना हा मेल आला. मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक लागतेच कसे, असा सवाल खासदार अनिल बोंडेंनी पोलिसांनाही विचारला होता. त्यानंतर त्यांना धमकीचा ई-मेल आल्याने अमरावतीत वातावरण तापले आहे.
नेमकं काय आहे मेल मध्ये?
अस्सलामुअलेकुम डॉ. साहेब, अशी या ई-मेलची सुरुवात आहे. इस्लामिक इन्फॉर्मेशनच्या विरोधात आपण जे शब्द वापरले, त्यांनी हैदराबादच्या मुसलमानांच्या मनात अशी आग लावली आहे की येथील वातावरण आता अतिशय तंग आणि तापलेले आहे. आपल्या बोलण्याने आमच्या मजहबी गैरतला जेवढा धक्का पोहोचला, तो राग आता लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. वृद्ध, तरुण, युवक, कुणाच्याही मनावर आता ताबा राहिलेला नाही.
आपण समजून घ्या डॉ. साहेब, ही सामान्य नाराजी नाही, हा तो राग आहे जो एका ठिणगीवर वणवा बनू शकतो. आपण आमची ओळख, आमचा दिन, आमची तालीम या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं धाडस केलं,आणि त्यामुळे संपूर्ण समुदायाच्या भावना जखमी झाल्या.
आज हैदराबादच्या महोल्ल्यांमध्ये आपल्या वक्तव्यामुळे अशी बेचैनी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे, की लोक आपला त्रास आणि आपला राग लपवूही शकत नाहीत. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो. आपण जी आग लावली, तिचा धूर आता खूप दाट झाला आहे. आपल्या प्रत्येक हावभावात येथील मुस्लिम समाजाला एक उघड्या जखमेप्रमाणे वेदना जाणवत आहे.
म्हणूनच, आपल्या जिभेवर आणि आपल्या विधानांवर संयम ठेवा. कारण, डॉ. साहेब, यावेळी आवरणे खूप अवघड झाले आहे. एक चुकीचा शब्दही वातावरण बिघडवण्यासाठी पुरेसा आहे. असा या ई-मेलमध्ये म्हटले आहे. हैदराबादची नाराज मुस्लिम बिरादरी म्हणून ई-मेलच्या अखेरीस उल्लेख आहे.