Amravati Student : अमरावती जिल्ह्यात शिक्षणासाठी नावेने धोकादायक प्रवास, नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांची व्यथा

| Updated on: Jul 25, 2022 | 10:05 PM

एका गावातून दुसऱ्या गावात जाणे हे पावसाळ्यात जिकरीचे काम आहे. त्यात नद्यांना पूर येत असल्यानं नाव केव्हा पुरात वाहून जाईल काही सांगता येत नाही.

Amravati Student : अमरावती जिल्ह्यात शिक्षणासाठी नावेने धोकादायक प्रवास, नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांची व्यथा
नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांची व्यथा
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातील नमस्कारी (Namaskari) गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. सद्या सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागतो आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच अप्पर वर्धा धरणाचे (Wardha Dam) सर्व तेरा दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. अनेक नदीकाठच्या गावांना पुराने वेढा घातला आहे. यातच नमस्कारी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नमस्कारी येथील विद्यार्थ्यांना अतिशय धोकादायक पद्धतीने वर्धा नदी (Wardha River) पात्र ओलांडून चक्क नावेत बसून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत आहे. पाचवीनंतर दुसऱ्या गावी शाळेत जावं लागते. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी खडतर आहे.

सुरक्षा जॅकेटची मागणी

नमस्कारी गावातील 25 विद्यार्थी दररोज वर्धा नदी ओलांडून भारसवाडी येथे शिक्षणासाठी जातात. मात्र वर्धा नदी सध्या भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांना वीस रुपये देऊन नावेतून जावे लागते. त्यामुळे आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने एक नाव देऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जॅकेटची व्यवस्था करावी, अशी छोटीशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या नमस्कारी गावात नीट रस्ते नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी नदी पात्र ओलांडून दुसऱ्या ठिकाणी नावेत बसून शाळा मध्ये जातात. आम्हाला सुरक्षा जॅकेट मिळणार का, असा प्रश्न प्रांजली नांदने या विद्यार्थिनीने विचारला. रुखमा कुईटेसारखे पालकही आपल्या पाल्याच्या सुरक्षित प्रवासासाठी चिंता करतात.

नदीचा प्रवास जोखमीचा

एका गावातून दुसऱ्या गावात जाणे हे पावसाळ्यात जिकरीचे काम आहे. त्यात नद्यांना पूर येत असल्यानं नाव केव्हा पुरात वाहून जाईल काही सांगता येत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. अशा विद्यार्थ्यांना सुरक्षा जॅकेट जिल्हा प्रशासनानं त्वरित पुरविले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांची भीती दूर होईल. अन्यथा घरून गेलेला मुलगा सायंकाळी नदी ओलांडून परतेल की, नाही ही चिंता पालकांना सतावत आहे.

हे सुद्धा वाचा