
Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची महाराष्ट्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. त्यांना गायनाची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या समाजोपयोगी कामातही त्या सक्रियपणे सहभागी होतात. गणेश विसर्जनानंतर त्यांनी समुद्रकिनाऱ्याची सफाई करण्याची मोहीम राबवली होती. वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानांचीही तेवढीच चर्चा होते. सध्या त्यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राजकारणावर आपले मत मांडले आहे. चांगले नेते पुढे यावेत, त्यांनी जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याबाबत बोलताना, गीता या पुस्तकाचे माझ्या हस्ते प्रकाशन झाले, याचा मला आनंद झाला आहे. नित्यानंद स्वामी यांचे हे पुस्तक आहे. गीता जीवनाचे सार सांगते. जगावे कसे हे शिकवते. सात्विक कसे रहावे हे शिकवते. आध्यात्मिक राहून स्वत:ला कसे घडवायचे ते शिकवते. सध्याच्या दिवसात अशी पुस्तके वाचायला हवीत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी राजकारणावरही भाष्य केले. राजकारण लोककल्याणासाठी आहे. महाभारत का झालं? कारण ते राज्यासाठी चांगले होते. त्याच बरोबर राजकारणातही चांगले नेते पुढे आले पाहिजेत. या नेत्यांनी जनतेची सेवा करायला हवी. त्यामुळे आपला देश आणि महाराष्ट्र पुढे जाईल. आता बिलो द बेल्ट राजकारण सुरू आहे, असे मत यावेळी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
तसेच अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. देवेंद्रजी असे मर्यादा पुरुष आहेत. ज्यांना काय करायचं हे ठाऊक आहे. ते महाराष्ट्राचे सेवक आहे. त्या दिशेने ते काम करत असतात. कोणी अपमान करो, दगड मारो लोकांची भलाई होत असेल तर ते संबंधित काम करत राहतात, असे मत अमृता फडणवीस म्हणाल्या.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरही त्यांनी भाष्य केले. एक तर त्या दोन भावांचा त्यांचा आपला प्रॉब्लेम आहे. त्यांची घरगुती बाब आहे. आपण आपले काम करत राहायचे. बाकीचे कोण कुठे गेले, कुठे जाणार आहे याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे म्हणत देवेंद्रजी कल्याणकारी नेते आहेत त्यांना लोककल्याणासाठी काम करायचे आहे. कोणत्याही पदावर राहून ते लोककल्याणाचेच काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.