
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आला आहे. आता लाडकी बहीण योजनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी आज रक्षाबंधनानिमित्त नागपुरातील दिव्यांग बांधवांना राखी बांधली. भाजपच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने आज नागपुरातील दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी अमृता फडणवीस यांनी अनेक दिव्यांग बांधवांना राखी बांधत हा सण साजरा केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी आधी माझ्या दोन भावांना राखी बांधायचे, आता दिव्यांग बांधवाना बांधत आहे”, असे अमृता फडणवीसांनी म्हटले.
“लाडकी बहीण योजनेमुळे देवेंद्र फडणवीस यांना कोट्यावधी बहिणी लाभल्या आहेत. त्यामुळे मलाही तेवढ्याच नणंद मिळाल्या आहेत. यामुळे आता संपूर्ण राज्यातील बहिणींसोबत माझं नणंद-भावजय हे नातं निर्माण झालं आहे. हे नवीन नातं मला खूप आवडत आहे. त्यामुळे आता आपण एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेऊ”, असे अमृता फडणवीसांनी म्हटले.
“देवेंद्र फडणवीसांनी ही योजना लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी आणली आहे. त्यात कोणताही राजकीय दृष्टीकोन नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर आणि त्यांनी याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनांवर विरोधकांनी टीका केली. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत. सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ते पुढेही ही योजना सुरु ठेवतील. तसेच त्यात आवश्यक वाढही देण्यात येईल, अशी अपेक्षाही मी व्यक्त करते”, असे अमृता फडणवीसांनी सांगितले.