
पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांचा हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे.
दरम्यान बुधवारी हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी वाढवली आहे. वैष्णवीची सासू, नणंद आणि पती यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली होती, तर तिचा दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी झालेल्या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला, वैष्णवीची नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होती, असा आरोप या वकिलाने केला, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता कस्पटे कुटुंबानं पत्रकार परिषद घेतली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणेंनी वैष्णवीचं दोनदा लग्न मोडलं, हगवणे कुटुंबात मला माझ्या मुलीचं लग्न नाईलाजानं करावं लागलं. फॉर्च्युनर गाडी मी स्वत:हून दिली नव्हती, त्यांनी माझ्या मुलीचा छळ करून फॉर्च्युनर मागितली, फॉर्च्युनरसाठी हगवणेंनी अग्रह केला होता, असं कस्पटे यांनी म्हटलं आहे. वैष्णवीच्या पतीच्या मोबाईलचा ईएमआय मी आजही भरत आहे, निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी आहे, निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवला असंही अनिल कस्पटे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हगवणेंच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, असा दावा त्याने केला आहे, यावर देखील कस्पटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोबाईलमधील चॅटबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नाही, असं कस्पटे यांनी म्हटलं आहे.