
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील मंत्री हे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी सावली नावाच्या एका रेस्टॉरंटवर कारवाई केली होती. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलीसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर आता याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला सावली बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती समोर येत आहे. योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबियांनी ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. आता यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली. योगेश कदम यांच्या विरोधात माझ्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. योगेश कदम यांची सगळी कुंडली काढली आहे. मी हे सर्व पुरावे घेऊन याबद्दल मी न्यायालयीन लढाई लढणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
“योगेश कदम यांच्या जेवढ्या संस्था आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीत योग सिद्धी, सिद्धयोग इत्यादी नावाच्या ज्या अनेक कंपन्या आहेत, त्याची सर्व माहिती, त्यांचे ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरु आहेत, याव्यतिरिक्त रत्नागिरीती ज्या शैक्षणिक संस्था चालतात त्याची माहिती काढली, प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती आली आहे आणि मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार माझ्यापर्यंत आला आहे. हे सर्व एकत्र करुन मी न्यायालयीन लढाई लढणार आहे”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
“मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय काहीच होत नाही. प्रत्येक व्यक्तीला तडफडत मुंबईत येऊन त्यांची भेट घ्यायला लागते. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी माणसं पाठवायला हवी होती. गोट्या गिते ह्याच नाव पहिल्या दिवसापासून मी घेत आहे. सगळी माहिती मी बीड मध्ये पोलिसांना देत होते. मात्र ही सगळेच लोक गायब आहेत. सातपुडा बंगल्यात झालेल्या बैठकीची चौकशी झाली नाही. वसई विरार महापालिका आयुक्त यांच्यावर कारवाई झाली. बदली झाल्यानंतर पण ते पदभार सोडत नाहीत”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.