पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, महाराष्ट्रात…, जरांगे पाटलांच्या आंदोलनावर रोहित पवार स्पष्टच बोलले
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. यावर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी ते येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. सरकारने आपल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा 30 मे पासून आमरण उपोषणाला बसणार असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
पेट्रोल आपल्याला मिळत नाही, डिझेल आपल्याला मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महागाई वाढत चालली आहे. अशा विषयांवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु जर पूर्णपणे आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा असेल तर एकच मार्ग आहे, ज्यांच्याकडे पार्लमेंटमध्ये जास्त मतदान आहे, त्या लोकांना विश्वासात घेऊन विरोधकांना देखील विश्वासात घेऊन संविधानामध्ये बदल करून मराठा समाजाला इतर समाजाप्रमाणे आरक्षण देता येईल. दिल्लीचा हा विषय आहे, जे नेते सत्तेत आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषय सुटू शकतो, उगाच आपल्याला त्रास न करून घेता, सरकारकडून प्रस्ताव पुढे न्यावा यातून मार्ग काढावा असा आम्हाला वाटतं, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अजय बारस्कर महाराजांची टीका
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सेटिंग पूर्ण न झाल्यानेच आता पुन्हा आंदोलन करणार आहेत, हैदराबाद गॅजेटचा जीआर आणून गुलाल उधळला, मग आता उपोषण कशासाठी? असा सवाल अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांना केला आहे.