आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाची बैठक, वारकरी ते मुख्यमंत्र्यांसाठी काय नियोजन?

| Updated on: Jun 30, 2021 | 3:16 PM

आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, या अनुषंगाने आज पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाची बैठक, वारकरी ते मुख्यमंत्र्यांसाठी काय नियोजन?
आषाढी वारी, फाईल फोटो
Follow us on

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने आज महत्वाची बैठक घेतली. कोरोना संकटाामुळे यंदाची आषाढी एकादशीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, या अनुषंगाने आज पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. (Important meeting of all departments in Pandharpur on the backdrop of Ashadi Wari)

आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या आणि पालख्यांसोबत वारकरी पालखीतळावर आल्यानंतर तिथून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या काळात बाहेरुन आलेल्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. पंढरपुरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत. वारकरी ज्या ज्या ठिकाणी थांबणार तो मठ आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतींचंही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

प्रांताधिकाऱ्यांच्या सर्व विभागांना सूचना

राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, तसंच पंढरपुरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या संतांच्या पालख्या आणि पादुका पंढरपूरमध्ये असणार आहेत. या काळामध्ये पोलीस विभागाने काय काळजी घ्यायची? तसेच नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान याबाबतही काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी ज्ञानेश्वर मंदिरात तपासणी

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै 2021 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत प्रस्थान सोहळा असेल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. पहाटे 4 ते 5 सर्व देवांची महापूजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 सप्ताहाच्या काल्याचे किर्तन देवकर महाराज करतील. दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम असेल.

संबंधित बातम्या :

प्रत्येकी 100 वारकरी, 1.5 किमी पायी वारी, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

Important meeting of all departments in Pandharpur on the backdrop of Ashadi Wari