
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार सकाळी 8.10 ला विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या 4 सभा होत्या. मात्र, 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. सरकारकडून या अपघात प्रकरणात सीआयडीची स्थापना करण्यात आली. केंद्र शासनाकडूनही अपघाताचा तपास केला जातोय. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वीची काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे विमान एका बाजूला झुकल्याचे दिसत आहेत. विमान धावपट्टीच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले. विमान ज्यावेळी कोसळले त्यावेळी अत्यंत मोठा आवाज झाला आणि थेट आग लागली. मोठ्या स्फोटानंतर तीन ते चार स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी राज्यात निर्माण झाली. पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यादरम्यानच आज अजित पवार यांचा तिसऱ्याचा विधी पार पडला आहे. अजित पवार यांच्या काही अस्थी नीरा-कऱ्हा नदीच्या संगमात सोडल्या आहेत तर उर्वरित अस्थी या विद्या प्रतिष्ठान परिसरातील झाडांच्या बुडात सोडणार असल्याचे पवार कुटुंबियांचे जवळचे व्यक्ती किरण गुजर यांनी सांगितले.
पुढे त्यांनी म्हटले की, पवार कुटुंब आणि आम्ही सर्वजण अजूनही दुःखात आहोत. त्यामुळे अद्याप राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पवार कुटुंबात कोणतीही पक्ष एकत्रिकरणाबाबत चर्चा झाली नाही. सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्षातील लोकं निर्णय घेईल. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्यावर पवार कुटुंबात चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट आहे.
काल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी राज्यभरातून लोक बारामतीत दाखल झाले. बारामतीत शोककळा बघायला मिळाली. यादरम्यान पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि उपमुख्यमंत्री नक्की कोण होणार? यावर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.