Ashish Shelar : हरल्यानंतर आपसात वाद घालणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी बोध घ्यावा अशी आशिष शेलारांची प्रतिक्रिया
Ashish Shelar : एकनाथ शिंदे शिवसेनेने पुणे आणि नागपूरमध्ये सहकार्य केलं नाही, म्हणून आम्ही हरलो असा भाजपचा आरोप आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी निकाल जाहीर झाले त्याच दिवशी हे बोलून दाखवलं.

विधान परिषद निवडणुकीत पाच पैकी तीन जागा गमावल्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वादविवाद सुरु आहेत. निकालाचा चित्र स्पष्ट झाल्यापासून एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमझ्ये कलगीतुरा रंगला आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अगदी लायकी काढण्यापर्यंत जाऊन विषय पोहोचला आहे. शिक्षक आणि पदवीधरच्या पाच जागांसाठी ही निवडणूक झाली. यात दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या होत्या. त्या महायुतीने जिंकल्या. पण पदवीधरच्या तिन्ही जागा गमावल्या. राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही पदवीधरची एकही जागा जिंकता आला नाही. हा फटका सर्वात जास्त भाजपला बसला. पुणे आणि नागपूर पदवधीरची जागा त्यांनी गमावली. छत्रपती संभाजीनगरची जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली. पण अमरावती शिक्षकची एकमेव जागा लढवणाऱ्या शिंदे शिवसेनेने ती जागा जिंकली.
एकनाथ शिंदे शिवसेनेने पुणे आणि नागपूरमध्ये सहकार्य केलं नाही, म्हणून आम्ही हरलो असा भाजपचा आरोप आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी निकाल जाहीर झाले त्याच दिवशी हे बोलून दाखवलं. महायुतीमधील अंतर्गत खदखद, असंतोष बाहेर आला. त्यानंतर शिंदे शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही. पण राज्यात नेतृत्व बदल आवश्यक असून एकनाथ शिंदे यांना राज्याचं मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली. कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करुन नवनाथ बन यांची लायकी काढली.
त्या घडायला नाही पाहिजे होत्या
या सगळ्या वादावर आता मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. भविष्यात महायुतीचा प्रवास कसा असेल हे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट होतं. “या सगळ्या गोष्टीत आता बोलून झालय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी सर्वांनी सहमतीने, एकमताने ठरवलय की आता पुढे जायचं आहे. या विषयावर पडदा पडला आहे” असं आशिष शेलार म्हणाले.
“ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या, त्या घडायला नाही पाहिजे होत्या. या शब्दात बोललं पाहिजे होतं का? त्यावर वरिष्ठ नेत्यांनी आता पडदा टाकला आहे. मतमतांतराच एक महत्व असतं. पण ते वादविवादापर्यंत नेणं योग्य नाही. कुठलाही पराभव काही ना काही शिकवून जातो. कुठलही अपयश हे उद्याच्या यशाची पायाभरणी असते. ज्या गोष्टी राहून जातात, त्या मनाला बोचतात. कुठलाही पराभव हा मनाला चटका लावणारा असतो. आत्मपरिक्षण करायला लावणारा असतो” असं आशिष शेलार म्हणाले. म्हणजे महायुती भविष्यात एकसंधच राहणार हे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट होतं.