Arun Kadam: मुलीसोबत घर सोडून जाताना तो फक्त बघत बसलेला..; अरुण कदम यांच्या बायकोचा खुलासा
Arun Kadam : बायको मुलीसोबत घर सोडून निघालेली, पण अरुण कदम पाहातच राहिलेले... तेव्हा नेमकं काय झालं याचा खुलासा अभिनेत्याच्या बायकोने केला आहे.

Arun Kadam : ‘घरो घरी मातीच्या चुली…’, असं म्हणतात ते काही खोटं नाही. सेलिब्रिटींना देखील घरातील वाद काही सुटलेले नाहीत. असंच काही विनोदवीर अभिनेते अरुण कदम यांच्या घरात देखील झालं आहे. मुलगी आणि बायको घर सोडून जात असताना अरूण कदम एक शब्द देखील बोलले नाहीत, तसेच बसून होते. याबद्दल नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली यांनी सांगितलं आहे…
वैशाली म्हणाल्या, ‘मी गृहिणी होते, पण घरबसल्या मी शेअरमार्केट देखील पाहायचे. मी गुंतवलेल्या पैशांमधून मला काही पैसे मिळालेले. त्यामुळे मी थोडे अजून पैसे गुंतवले. आम्ही खार येथील जे घर घेतलं होतं, ते त्याच पैशांमधून घेतलं होतं. माझे अर्थे पैसे आणि अरुणचे अर्थे पैसे… असं करत आम्ही घर घेतलं होतं. त्याआधी आम्ही खार पूर्वेला राहत होतो. पण तिथे माझं मन रमतच नव्हतं… सतत असं वाटायचं येथून निघून जावं, पण अरुणची आई शेजारी असल्यामुळे, मी आईला सोडून कुठेच येणार नाही…असं त्याचं मत होतं.’
‘तेव्हा मी अरुणला सांगितलेलं असं केलंस तर कसं होईल! घराच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे आताच गुंतवणूक केलेली योग्य ठरेल… माझी एक मैत्रीण होती, ती मला म्हणालेली, तेथून निघ… जर तू आता निर्णय घेतला नाहीस, तर पुढे काहीच होणार नाही… पण अरुण तयार नव्हता… अशात मी एकटीने रेंटवर घर घेतलं आणि मुलीसोबत तिथे राहू लागले… एकटीच घर वैगरे बघून आले.’
पुढे वैशाली म्हणाल्या, ‘माझी लेक कायम माझ्यासोबत असायची. मी तिला सांगितलं होतं, मी एक निर्णय घेत आहे. यावर ती मला म्हणालेली, ‘ठीक आहे, तु निर्णय घेत अहेस, म्हणजे बरोबरच असेल…’ मी घर जाऊन पाहून आले. सर्व व्यवहार देखील एकटीने केले. सुरुवातीला रेंटवर राहिले. कारण त्या परिसरात राहिल्याने आजूबाजूच्या घरांची माहिती मिळते…’
‘तेव्हा माझ्याकडे पैसे होते म्हणून अरुणला जास्त भाव दिलाच नाही..’, असं त्या विनोदी अंदाजात म्हणाल्या. ‘मी घरातून निघत होते. पण अरुण तयारच नव्हता. मी ट्रक बोलावला आणि सर्व सामान भरु लागले. पण त्याच्या कपड्यांना मी हात लावला नाही. तो देखील काहीच न बोलता एकाच जागी बसून होता…’
‘काहीही झालं तरी मी आईला सोडून येणार नाही…’ या मतावर अरुण कदम ठाम होते. पुढे वैशाली म्हणाल्या, ‘मी माझा संसार भरला… शेवटची बॅग घरातून बाहेर काढत असताना मी अरुणला विचारलं येणार आहेस का? यावर म्हणाला, भर माझी बॅग… मी स्वतः त्याची बॅग भरली. पण त्याने मदत केली नाही. त्याला ज्या शॉल मिळालेल्या त्यामध्येच त्याचे कपडे भरले आणि निघाले..’ असं देखील वैशाली म्हणाल्या.
