Ashok Kharat: खरातला मदत करणाऱ्या एजंट्सना धडा शिकवणार; SIT च्या रडारवर कोण कोण?
फक्त महिलांचं लैंगिक शोषणच नव्हे तर जमीन खरेदी-विक्री व्यवहारातही अशोक खरातने अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी आता जमीन खरेदी-व्रिकीचा व्यवहार करणारे एजंट्ससुद्धा एसआयटीच्या रडारवर आहेत.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकरत आहे, तसतशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातने कोणाकोणाला आणि कशाप्रकारे फसवलं, याची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे. तसंच लाखोंची जमीन खरातने कवडीमोल भावामध्ये नावावर करून घेतल्याच्याही घटना उघडकीस येत आहेत. आता खरातच्या जमीन खरेदी-विक्रीचे एजंटसुद्धा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर आहेत. याप्रकरणी आता जमीन खरेदी-विक्री एजंट्सचीही चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नव्हे तर नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारीदेखील एसआयटीच्या रडारवर आहेत.
एजंट्सचीही होणार चौकशी
तब्बल 60 लाख रुपयांची जमीन 22 लाख रुपयांना बळकावल्याच्या गुन्ह्यात अशोक खरातसोबत फिर्यादीची ओळख एजंटच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आली आहे. खरातचे आर्थिक व्यवहार तपासले असता काही एजंटदेखील जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. जमीन व्यवहारात अनेक ब्रोकर तसंच शासनातील अधिकारी अशोक खरातला मदत करत होते का, असा संशय यावरून व्यक्त होत आहे.
एसआयटीच्या रडारवर कोण कोण?
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून केला जात आहे. खरातने किती जणांना फसवलं, किती महिलांवर अत्याचार केले, याची माहिती एसआयटीच्या तपासात उघड होत आहे. एसआयटीला खरातकडून अजून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. त्याच्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत आहेत. खरातने फसविण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीमुळे तपास अधिकारीही थक्क झाले आहेत. जमीन व्यवहारांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आता अधिकारी एजंट्स आणि महसूल अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं कळतंय.
खरातला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारा कोणीही असला तरी त्याला धडा शिकवणारच अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार ही चौकशी करण्यात येणार आहे. खरात प्रकरणासंदर्भात ज्या ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावा मिळेल, त्याचा कोणा कोणासोबत संपर्क, व्यवहार होता, त्याला कोण कोण मदत करीत होते, याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली होती.