खरातचा नवा प्रताप उघड! अधिकाऱ्यांना एकमेकांच्या… बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
एका बड्या नेत्याने अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट दिली आहे. या नेत्याने अशोक खरातने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना काय सांगितले होते याचा खुलासा केला आहे.

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अनेक महिलांनी अशोक खरातवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली. अशोक खरात विरोधात जवळपास 11 तक्रारी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया आल्या आहेत. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात बाबत मोठा खुलासा केला आहे. ‘अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला सांगायचा’ असे म्हटले आहे.
काय म्हणाले?
नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशोक खरात प्रकणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी खरातचे अनेक काळे करानामे उघड केले आहेत. “अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अधिकारी भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला समर्थन द्यायचे. बाकी आतमध्ये काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. सध्या समोर येणारे व्हिडीओ सिलेक्टेड आहेत. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 1000 व्हिडीओ आहेत, पण त्यापैकी फक्त 150 व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे” असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा. हे किती घाणेरडं आणि महाराष्ट्राची इभ्रत काढणारं प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या कथित ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. अशोक खरात प्रकरणाची सध्या एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. अशोक खरातला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपीला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.