Ashok Kharat : ना ज्योतिष, ना अंकशास्त्राचे प्रशिक्षण, तरीही ‘भोंदू बाबा’ बनून फसवत राहिला.. खरातचा आणखी एक कारनामा उघड

ज्योतिष किंवा अंकशास्त्राचे शिक्षण नसतानाही स्वतःला आध्यात्मिक सल्लागार भासवणाऱ्या अशोक खरातच्या फसवणुकीचे आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप ईडीने केले आहेत. त्याचे अनेक नवे कारनामे समोर येत असून स्वतःच्या पैशातून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे खरातने मान्य केलं आहे.

Ashok Kharat : ना ज्योतिष, ना अंकशास्त्राचे प्रशिक्षण, तरीही भोंदू बाबा बनून फसवत राहिला.. खरातचा आणखी एक कारनामा उघड
भोंदू अशोक खरातचे कारनामे
| Updated on: Jul 24, 2026 | 9:10 AM

मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी काही कमी होईना, उलट दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरोधात दाखल केलेल्या अभियोग तक्रारीत अनेक महत्त्वाचे आणि गंभीर दावे करण्यात आले आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी आणि स्वतःच्या पात्रतेबाबत केलेल्या कबुलीजबाबांकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.अनेक महिलांचे शोषण केल्याचा, त्यांना फसवल्याचा तर खरातवर आरोप आहेच पण त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबतही संशय निर्माण झाला. उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याच्या आरोपांची चौकशी करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केल्यावर बरीच धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी ईडीकडून अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत.

ना अभ्यास, ना औपचारिक प्रशिक्षण, भोंदूकडून अनेकांची फसवणूक

आपण ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र या विषयांमध्ये कोणतेही औपचारिक शिक्षण, प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र कधीही घेतले नव्हतं, असं अशोक खरातने चौकशीदरम्यान कबूल केल्याचं ईडीच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. कोणताही अभ्यास किंवा प्रशिक्षण नसानाही, अशेक खरातने जवळपास दोन दशकांहून अधिक काळ स्वतःची प्रतिमा एक प्रभावी आध्यात्मिक सल्लागार म्हणून निर्माण केली. त्याच्या भविष्यवाण्या, धार्मिक विधी आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे अनेक व्यावसायिक, राजकारणी, उद्योगपती आणि इतर प्रभावशाली व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

तसेच या प्रभावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले, असा आरोप तपासादरम्यान ईडीने केला आहे. चौकशीत अशोक खरात याने स्वतःच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे मान्य केलं, असही ईडीने नमूद केलं आहे. नऊ मालमत्तांच्या खरेदीमध्ये एकूण व्यवहारातील 5 कोटींहून अधिक रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात आली होती. ही रक्कम एकूण खरेदी मूल्याच्या सुमारे ४४ टक्के असल्याचे ईडीने नमूद केलं. तपास यंत्रणेच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार झाल्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि याच पार्श्वभूमीवर मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, निधीचा स्रोत, मालमत्तांची खरेदी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा सखोल तपास करण्यात आला असून त्याआधारे न्यायालयात अभियोग तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं सांगण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, अंतिम निर्णय न्यायालयाकडून होणे बाकी आहे. त्यामुळे ईडीने केलेले आरोप आणि तक्रारीतील दावे हे न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.

 

Follow Us