
मोठी बातमी समोर येत आहे, जालन्यात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.
एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात धनगर बांधवांचं आंदोलन सुरू आहे, आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी आज गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात दाखल झाले आहेत. याचवेळी त्यांच्या वहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे. असा हल्ला करुन मला कोणीही थांबवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
मी आज डंके की चोट पर बोलणार आहे, धनगर बांधव एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी लढत आहेत. त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, मी जालन्याकडे येत असताना काही लोकांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असा हल्ला करुन मला कोणीही थांबवू शकत नाही. आपण संविधानाला जोडलेलो आहोत. मी तुमच्या भेटीला आलो, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे, म्हणून आलो. स्टंटबाजी करण्यासाठी आलो नाही, नाटक करण्यासाठी आलो नाही. मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार माझं ऐकतं, इंग्रजांच्या काळात जे समूह आदिवासी होते ते दुसरे तिसरे कोणी नसून धनगर आहेत, असा दावाही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
आरक्षणासाठी आंदोलन
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदरबाद गॅझेट लागू केल्यानंतर बंजारा समाजाकडून देखील आमचा समावेश हा एसटीमधे करावा यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे जालन्यात देखील धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली, याचवेळी त्याच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.