लोक भगवदगीता, कुराण वाचत नाहीत पण..; ए. आर. रेहमान यांच्या मुलीने ट्रोलर्सना झापलं
गायक आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे सध्या त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक असून गेल्या 8 वर्षांपासून मला काम मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. आता त्यांच्या मुलांनी वडिलांची बाजू घेतली आहे.

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान हे त्यांच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्यांनी फिल्म इंडस्ट्री आणि ‘छावा’ या चित्रपटाबद्दल आपली मतं बिनधास्तपणे मांडली होती. परंतु त्यावरून आता त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. हा वाद वाढत असल्याचं पाहून त्यांनी माफी मागत स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं. आता ए. आर. रेहमान यांची मुलं त्यांच्या समर्थनार्थ टीकाकारांना सडेतोड उत्तर देत आहेत. ‘लोकांकडे भगवदगीता, कुराण आणि बायबल वाचायला वेळ नाही, पण एकमेकांशी भांडायला, इतरांची खिल्ली उडवायला, भडकवायला, शिवीगाळ करायला खूप वेळ आहे’, अशा शब्दांत रेहमान यांची मुलगी रहीमाने ट्रोलर्सना सुनावलं आहे.
रहिमाने लिहिलं, ‘लोकांकडे भदवदगीता, कुराण आणि बायबल वाचण्यासाठी वेळ नाही. हे पवित्र ग्रंथ प्रेम, शांती, शिस्त आणि सत्य शिकवतात. पण या लोकांकडे वाद घालण्यासाठी, थट्टा करण्यासाठी, चिथावणी देण्यासाठी, शिवीगाळ करण्यासाठी आणि एकमेकांचा अनादर करण्यासाठी नेहमीच वेळ असतो. हा धर्म नाही. हे एका अंध समाजामुळे, अपूर्ण शिक्षणामुळे, विषारी राजकारणामुळे आणि वाईट संगोपमनामुळे निर्माण झालं आहे. एक अशी पिढी जी मानवतेपेक्षा द्वेषाला जास्त निष्ठावान आहे.’

ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीननेही सोशल मीडियावर वडिलांना पाठिंबा दर्शवला आहे. रेहमान यांनी किती वेळा या देशाला गर्व करण्याची संधी दिली, याविषयी त्याने लिहिलं आहे. रहिमा आणि खतिजा या दोन्ही मुलींनीसुद्धा वडिलांचे जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रेहमान हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत असून त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रेहमान हे जगप्रसिद्ध ‘कोल्डप्ले’ बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनसोबत परफॉर्म करताना दिसत आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. “ए. आर. रेहमान यांचं संगीत असो, एस. एस. राजामौली यांची कथाकथनाची कला असो.. हे भारतीय संस्कृतीचा आवाज बनले आहेत”, असं मोदी म्हणत आहेत.
रेहमान यांनी एका मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही त्यांनी टिप्पणी केली. गेल्या आठ वर्षांत मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नसल्याचा खुलासा रेहमान यांनी या मुलाखतीत केला.
