
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे, काही दिवसांपूर्वीच भाजपकडून प्रत्येक विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या, या बैठकांमध्ये त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूक तयारीचा आढवा घेण्यात आला आहे, दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू आहेत.
मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी चक्क भाजपचा कार्यकर्ता पाठवला असा आरोप होत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबईतील बैठकीला सोलापूरच्या शहराध्यक्षांनी प्रतिनिधी म्हणून भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप होत आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका गटाकडून हा आरोप करण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित नव्हते, त्याऐवजी त्यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला या बैठकीसाठी पाठवल्याचा आरोप सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महेश गाडेकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.
दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी शहराध्यक्षांना जाब विचारला असता त्यांच्याकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे, तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं सुधीर खरटमल यांनी म्हटलं आहे. माझं तिकीट कन्फर्म झालं नाही. त्यामुळे मुंबईत माझे मित्र महेश गाडेकर होते, त्यांना मी या बैठकीला पाठवले असं उत्तर यावर खरटमल यांनी दिलं आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांकडून गाडेकर हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप झाल्यानं या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.