भाजपा आमदाराच्या लेटरबॉम्बने खळबळ, निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठांचं टेन्शन वाढलं!
भाजपाच्या आमदाराने थेट पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. या पत्रामुळे भाजपाची अडचण होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नेमके काय होणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

Sangli Local Body Election : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता जिल्हा तसेच तालुका पातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळावे यासाठी नेते मंडळी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या घरी, ऑफिसात भेटी घेत आहेत. दुसरीकडे काही नेतेमंडळी सोईचा पक्ष पाहून पक्षांतर आहेत. याच इन्कमिंगमुळे पक्षनिष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. दुसरीकडे युती आणि आघाडीच्या राजकारणात जागावाटपामुळेही काही ठिकाणी वाद चालू असल्याचे दिसत आहे. याच वादाचा एक नवा अध्याय आता समोर आला आहे. भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जागावाटपावरून एक लेटरबॉम्ब टाकून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.
नेमकं काय घडतंय?
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुधीर गाडगीळांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. गाडगीळांच्या या लेटर बॉम्बमुळे सांगलीच्या राजकाणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. या लेटरबॉम्बच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
सुधीर गाडगीळ यांनी थेट पत्र लिहून…
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच काँग्रेस मधून भाजपात आलेल्या जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जयश्रीताई गटाला 22 जागा देऊ, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. यालाच आक्षेप घेत सुधीर गाडगीळ यांनी थेट पत्र लिहित या जागावाटपाला विरोध दाखवला आहे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा गाडगीळ यांनी दिला आहे.
मग 22 जागा कुणाला देणार?
चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या गटाला एकूण 22 जागा देण्याचे आश्वासन दिल्यामुळे भाजपामधील निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून आता सुधीर गाडगीळ भाजपा कार्यकर्त्यांसाठी सरसावले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेसमधून केवळ सहा जणांचाच भाजपात प्रवेश झाला आहे. मग 22 जागा कुणाला देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपाच्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिकाच गाडगीळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
भाजपाला फटका बसण्याची शक्यता?
त्यामुळे आता निवडणूकीच्या तोंडावर सांगली भाजपामध्ये गाडगीळ विरुद्ध जयश्रीताई पाटील गट असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याच संभाव्य संघर्षामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. हा संघर्ष निवडणुकीपर्यंत कायम राहिला तर त्याचा फटका सांगली पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा वाद भाजपाचे वरिष्ठ नेते नेमका कसा सोडवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
