
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाचा एक फोटो आता समोर आला आहे. यावरून विरोधकांकडून आता अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून निशाणा साधला आहे. त्यांच्यावर कदाचित दबाव असावा असा खोचक टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान त्यानंतर आता खासदार सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
‘एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.’ असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
रोहित पवारांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं. तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे देखील त्यांनी आरएसएसच्या प्रमुखांना विचारायला हवं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.