Aurangabad | शाळा सोडून कोण कोण मदरशात जातंय, यादी करा, औरंगाबादेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढले आहे.

Aurangabad | शाळा सोडून कोण कोण मदरशात जातंय, यादी करा, औरंगाबादेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 11:53 AM

कोरोना संकटानंतर (Corona) जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करताना शिक्षण विभागासमोर (Education Department) धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शालाबाह्य मुलांनी शाळेत न येण्यामागची कारणं काय आहेत, हे शिक्षण विभागानं जाणून घेतलं. यावेळी काही गावांतील मुले शाळेच्या वेळात मदरशांमध्ये (Madarsa) जात असल्याचं आढळलं. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांतील उपस्थिती कमी होत आहे. परिणामी आता औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक आदेशच काढलाय. जिल्हा परिषद शाळांत केवळ नावालाच हजर आणि प्रत्यक्षात मदरशांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करा आणि माझ्याकडे पाठवा, असे आदेश चव्हाण यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र गेलंय.

शिक्षण विभागाला काय आढळलं?

औरंगाबाद जिल्ह्यात जि.प.च्या एकूण 4602 शाळा आहेत. ऊर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या 443 आहे. ऊर्दू माध्यमाचे 1 लाख 18 हजार 419 विद्यार्थी शिकतात. कोरोना काळानंतर शालाबाह्य मुलांची संख्या मोठी असल्याचे समोर आले होते. त्यासाठी बालविवाह, बालमजुरी, स्थलांतर ही कारणं सांगितली जात होती. यासाठी शिक्षण विभागाने सर्वेक्षण केले असता जिल्ह्यात 1244 शालाबाह्य मुले असल्याचे समोर आले. कादराबाद गावात तपासणी करताना शाळेतील गैरहजर मुले मदरशात शिक्षण घेतात हे दिसून आले. इतर गावातही असे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश काय?

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढले. जिल्हा परिषद शाळांच्या पटावरील शाळानिहाय किती विद्यार्थी शाळेच्या वेळात मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात ? याची माहिती 1 सप्टेंबर रोजी न चुकता विना विलंब सादर करावी. असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून अशी किती आकडेवारी समोर येते, हे वास्तव पाहणे उचित ठरेल.

मदरसा म्हणजे नेमकं काय ?

मदरसा म्हटलं की, पूर्वीपासून धार्मिक शिक्षण देणारी संस्था अशीच ओळख आहे. मुस्लिम समाजातील मुलामुलींनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी धार्मिक,पारंपरिक शिक्षणाची ओढ कायम ठेवत आधुनिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना मदरसा म्हणून संबोधले जाते.अरबीचा आग्रह तेथे आहेच,अन्य शिक्षणाचीही आवड निर्माण व्हावी,यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात.आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदरशात प्राधान्याने प्रवेश दिला जातो.