Aurangabad | भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या वादावर अखेर पडदा, औरंगाबादेतही रेल्वे पिटलाइन, 29 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर

Aurangabad | भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या वादावर अखेर पडदा, औरंगाबादेतही रेल्वे पिटलाइन, 29 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर
Image Credit source: tv9 marathi

प्रवासी रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी औरंगाबादेत ओपन पिटलाइन उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 29 कोटी 94 लाख 26 हजारांचा निधी मंजूर केल्याचे आदेश रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक शैलेश सिंग यांनी नुकतेच काढले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 19, 2022 | 3:13 PM

औरंगाबादः लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या आपल्या स्टेशनवर देखभाल दुरुस्तीसाठी थांबतील आणि प्रवाशांची आवक-जावक वाढेल. पर्यायानं जिल्ह्याचा  विकास (Development) होईल, असा उद्देश ठेवत रेल्वेची पीटलाइन (Railway Pitline) औरंगाबादमध्ये विकसित करायची की जालन्यात हा वाद सुरु झाला आणि अखेर अनेक महिन्यानंतर यावर पडदा पडला. हा वाद सुरु होता भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये. औरंगाबादचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि जालन्याचे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve). कराडांनी आधी औरंगाबादेत रेल्वेच्या पीटलाइनची घोषणा केली. यासाठी चिकलठाणा येथील जागेचा प्रस्तावही दिला. मात्र मध्येच खोडा घालत दानवेंनी ही पीटलाइन जालन्यात होईल, अशी घोषणा केली. औरंगाबादची पीटलाइन पळवल्याचा आरोप दानवेंवर झाला. रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने औरंगाबादमध्येच पीटलाइन होण्याचा आग्रह धरला. हा वाद रेल्वे मंत्र्यांपर्यंत गेला. अखेर जालन्याप्रमाणेच औरंगाबादमध्येही पीटलाइन होईल, अशी घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे दोन मंत्र्यांमधील या वादावर पडदा पडल्याचं बोललं जात आहे.

किती कोटींचा निधी मंजूर?

प्रवासी रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी औरंगाबादेत ओपन पिटलाइन उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 29 कोटी 94 लाख 26 हजारांचा निधी मंजूर केल्याचे आदेश रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक शैलेश सिंग यांनी नुकतेच काढले. रेल्वेच्या अंब्रेला योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादेत पिटलाइनचा फायदा काय?

  • औरंगाबादेत ओपन पीटलाइन झाल्यानंतर औरंगाबादहून वाराणसी, अलाहाबाद, जोधपूर, बिकानेर, अहमदाबाद, पाटणा, बंगळुरू, गोवा आदी ठिकाणी गाड्या सुरु होतील.
  • तसेच शटल वाहतुकीसाठी अतिरिक्त डेमू सुविधा प्राप्त करणे शक्य होईल.
  • औरंगाबाद स्थानकावर कोमटेक तंत्रज्ञानाची खुली पिटलाइन उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दीली आहे. त्यामुळे येथे सुरुवातीला 16 डब्यांच्या प्रवासी रेल्वेची देखभाल दुरुस्ती होऊ शकेल.
  • विशेषतः एसी प्रवासी रेल्वेची देखभाल येथे होणार आहे.
  • या पिटलाइनमुळे देशातील इतर पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी औरंगाबादेतून नवीन रेल्वे सुरु करणे शक्य होणार आहे.
  • सुमारे साडे चार हजार किंवा त्यापेक्षा जास्त प्रवास करून आलेल्या रेल्वेची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता, पाणी भरणे, ऑयलिंग व इतर सुरक्षेची तपासणी येथे केली जाईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें