
औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारला हादरवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडत असून शिवसेना आमदारांच्या या बंडात औरंगाबादचे आमदारही शामिल आहेत की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद हा मुंबई पालिकेनंतर शिवसेनेचा दुसऱ्या क्रमांकाच भक्कम गड मानला जातो. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेचे सहा (ShivSena MLA) आमदारही काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 11 आमदारांना घेऊन सूरतमधील हॉटेलमध्ये रात्रीपासूनच मुक्कामी आहेत, अशी माहिती उघड झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात बंड पुकारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूरतमध्ये खलबतं सुरु आहेत, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात औरंगाबादमधील 9 आमदारांपैकी 6 आमदार नॉट रिचेबल असल्याने शहरातील मनपामधील शिवसेनेच्या सत्तेलाही खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उदयसिंह राजपूत- कन्नड विधानसभा आमदार
संजय शिरसाठ- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघ
रमेश बोरणारे- वैजापूर विधानसभा मतदार संघ
प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ
अब्दुल सत्तार- सिल्लोड विधानसभा मतदार संघ
संदीपान भुमरे- पैठण विधानसभा मतदार संघ
शिवसेनाचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील 6 शिवसेना आमदार फुटले तर महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा हादरा बसेल. यासोबतच औरंगाबादमधील शिवसेनेची सत्ता गमावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही महिन्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याची जोरदार तयारीही शहरात सुरु आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडात हे आमदार शामिल झाले तर महापालिकेतील सत्ता शिवसेनेच्या हातून गमावण्याची भीती आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर राज्यात होऊ घातलेल्या विविध महापालिकांतील निवडणुकांवर याचा गंभीर परिणाम होतील. आगामी काळात ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक महापालिकांच्या निवडणुका आहेत. शिंदेंच्या या बंडामुळे महापालिकेवर परिणाम होऊ शकतो. तसेच अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषदही शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.