औरंगाबादेत डिझेलच्या टँकरचा अपघात, नागरिकांची ड्रम, भांडे घेऊन घटनास्थळी धाव

| Updated on: Jun 19, 2021 | 8:05 PM

टँकर पलटी झाल्याचे समजताच करंजगाव परिसरात राहणाऱ्या लोकांनी डिझेल जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांची झुंबड उडाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डिझेल चोरी रोखण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादेत डिझेलच्या टँकरचा अपघात, नागरिकांची ड्रम, भांडे घेऊन घटनास्थळी धाव
Follow us on

औरंगाबाद : डिझेल घेऊन जाणारा मोठा टँकर पलटी झाल्याची घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील करंजगाव येथे घडली. टँकर पलटी झाल्याचे समजताच करंजगाव परिसरात राहणाऱ्या लोकांनी डिझेल जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांची झुंबड उडाल्याचे समजताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत डिझेल चोरी रोखण्याचा प्रयत्न केला. (Diesel tanker overturned in Aurangabad district villagers ran to collect diesel)

नेमंक काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील करंजगाव येथे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरून एका टँकरमध्ये डिझेलची वाहतूक केली जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टँकर अचानक पलटी झाला. त्यानंतर टँकर उलटल्यामुळे त्यातील डिझेल रस्त्यावर गळायला लागले.

डिझेल जमा करण्यासाठी लोकांची झुंबड

करंजगाव येथे टँकर पलटी झाल्यामुळे त्यातून डिझेलची मोठ्या प्रमाणात गळती होत होती. अपघात झालेल्या परिसरात सर्वत्र डिझेल सांडले होते. ही घटना समजताच लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच सांडलेले डिझेल जमा करण्यासाठी अपघातग्रस्त टँकरच्या बाजूने मोठी गर्दी केली. काही लोक तर चक्क प्लास्टिकच्या कॅन तसेच भांडे घेऊन आले होते. कसलीही तमा न बाळगता भल्या सकाळी डिझेल जमा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

पाहा व्हिडीओ :

पोलीस दाखल होईपर्यंत शेकडो डिझेलची चोरी

दरम्यान, सद्यस्थितीला देशात इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यामुळे पेट्रोल तसेच डिझेलच्या बाबतीत नागरिक आधीच त्रासलेले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी अपघातग्रस्त डिझेलच्या टँकरमधून डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनीही पलटी झालेल्या टँकरडे धाव घेत लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या लोकांना डिझेल चोरी करण्यापासून रोखलं. मात्र, पोलीस येण्याच्या आधीच लोकांनी शेकडो लिटर डिझेलची चोरी केली होती.

इतर बातम्या :

औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक, 21 जूनपासून नियम शिथिल

तब्बल 10 वर्षांपासून वीज जोडणी नाही, शेवटी विहिरीत उतरून आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

(Diesel tanker overturned in Aurangabad district villagers ran to collect diesel)