500 कोटींचं प्रकरण : मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा निर्णय, म्हणाले, आता आम्ही…

500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली असून, सरकार तपास करणार नसल्यास हे दोन्ही नेते यात सामील असल्याचा अर्थ निघेल असे म्हटले आहे. जरांगेंनी स्वतः तपास करण्याची घोषणा करत, क्लिप खोटी नसल्याचेही ठामपणे सांगितले.

500 कोटींचं प्रकरण : मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा निर्णय, म्हणाले, आता आम्ही...
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 12:20 PM

कथित ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अधिकच आक्रमक झाले आहेत. सरकारने या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला नाही तर यामागे हे दोन्ही नेते होते असा त्याचा अर्थ निघेल, असा दावा करतानाच आता आम्ही या प्रकरणाच्या खोलात गेलो आहोत. आमची यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करणार आहे, अशी सर्वात मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. मी या प्रकरणाच्या खोलात गेलो आहे. तुमची यंत्रणा काय करते ते पाहतो. आमची मराठ्याची यंत्रणा काय करते तेही दिसेल. आम्ही या प्रकरणाचा तपास करणार आहोत. ही क्लिप खोटी ठरवू, असं तुम्हाला वाटत असेल. पण अजिबात नाही. आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

Loading...

ती बाई मोठ्या पदावर

या क्लिपमधील बाई मोठ्या पदावर असल्याचं सांगितलं जातं. ती प्लानिंगचं मोठं नेटवर्क चालवते असं कळतंय. तिच्याकडे मी कशाला जाईल? जर मी ही क्लिप तयार केली असेल किंवा ती एआयने तयार केली असेल तर श्रीरामपूरला मर्डर झाला, संभाजी नगरला एका मुलीचं काही तरी झालं. मी हे विषय त्या क्लिपमध्ये कशाला घेईल? आम्ही फक्त त्यात आमचेच विषय घेऊ ना? मी माझंच बघेल ना? मराठा समाज आणि जनतेला सर्व कळतंय. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही पक्के अस्वस्थ झाला आहात. तुम्ही यात गुंतला आहात. तुम्ही हे प्रकरण दाबलं तर तुमचाच हात यात होता हे सिद्ध होईल, असंही जरांगेंनी म्हटलंय.

एकनाथ शिंदे अस्वस्थ

500 कोटी रुपये दिले असले तरी भाजपवाले गप्प बसणार नाही. दोन्ही पक्षात आतून खदखद आहे. शिंदेंना पैसे दिले हे ती महिला खोटं कशाला सांगेल? ती चिल्लर बाई असती, कंत्राट पद्धतीने कामाला असती तर ठिक होतं. पण ती मोठ्या पदावर आहे. ती कशाला खोटं बोलेल? आणि शिंदेंनी घेतले असेल तर ती गप्प बसणार नाही, असं सांगतानाच दोन्ही पक्षातील खदखद डेंजर आहे. आम्हाला रोज माहिती येतेय. त्यांच्या गोटात काय चाललंय हे कळतंय. शिंदेही अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर आरोप झाला. आपण रोष पत्करला. ठाकरेंना सोडलं. आणि आता आपल्यावर ही वेळ आणली का? असं शिंदेंना वाटत आहे. हे प्रकरण सोपं नाहीये. त्यामुळे शिंदे अस्वस्थ असतील. त्यांचं करिअर बर्बाद करण्याचा हा डाव होता, असं त्यांनी सांगितलं.

एवढी मोठी क्लिप बनूच शकत नाही

ही खोटी क्लिप नाहीये. एआयने एवढी मोठी क्लिप बनू शकत नाही. एआयच्या तज्ज्ञानेही स्पष्ट केलंय. एआय मराठीत एवढी मोठी क्लिप तयार करण्यासाठी सक्षम नाहीये, असं सांगतानाच मला सरकारने खूप त्रास दिला आहे. मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून त्रास दिला. मी आंदोलनात होतो. आता यांच्या मागे लागतो. यांचेच पुरावे यांना देतो, असंही त्यांनी म्हटलं.

आम्ही झक मारायला आलोय का?

दोन्ही पक्षात आतून खदखद आहे. फक्त मीडियावर ते बोलत नाहीत. आम्ही तिथून इकडे झक मारायला आलोय का? असं शिंदे गटाचे लोक म्हणत आहेत. तुम्ही आमच्या मागून प्लानिंग करणार, पेरणी करणार आणि शिंदेंना संपवणार ही त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. आरोप प्रत्यारोप लोकांना दिसू नये म्हणून ते खोटं खोटं एकमेकांना अलिंगन देत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us