अंध कार्यकर्ता ढसढसा रडला, मनोज जरांगे पाटील भावूक; अखेर पाणी प्यायले

| Updated on: Oct 29, 2023 | 7:19 PM

उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आज घोटभर पाणी घेतलं. मराठा समाजाने केलेल्या आग्रहामुळे आणि संभाजी छत्रपती यांनी फोन करून विनंती केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतलं. गेल्या पाच दिवसात त्यांनी दुसऱ्यांदा पाणी घेतलं आहे. मात्र, पाच दिवसात त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना बोलतानाही त्रास होत आहे.

अंध कार्यकर्ता ढसढसा रडला, मनोज जरांगे पाटील भावूक; अखेर पाणी प्यायले
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात त्यांनी अन्नच काय पाणीही घेतलं नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. पण तरीही जरांगे पाटील उपोषण करत आहेत. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. बोलताना त्यांना धाप लागत आहे. त्यामुळे मराठा समाजात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जरांगे पाटील यांनी किमान पाणी प्यावं असा आग्रह आज समाजाने केला. एका अंध कार्यकर्त्याने तर ढसढसा रडून त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सर्वांचा मान राखत पाण्याचा घोट घेतला.

मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले. एक अंध कार्यकर्ता ढसढसा रडायला लागला. तो हमसून हमसून रडत होता. खामगावचा हा कार्यकर्ता आहे. त्याने जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अर्ध समाधी घेतली. त्याने 48 तास स्वत:ला त्याच्याच शेतात गाडून घेतलं. त्यानंतर तो आंदोलन स्थळी येऊन रडू लागला. तो धायमोकलून रडत होता. जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं असा आग्रह त्याने धरला. त्याच्या या मागणीला उपस्थिांनी पाठिंबा दिला.

लाख मेले तरी चालतील…

पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या… अशा घोषणा सुरू झाल्या. या घोषणा प्रचंड वाढल्या. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, असं लिहिलेली पोस्टर्स झळकावण्यात आली. जरांगे पाटलांना काही झालं तर नेत्यांना महाराष्ट्रात निवडणूक नव्हे, जिल्ह्यात कायमची बंदी करू, असा इशारा देण्यात आला.

अन् पाणी घेतलं

सर्वांचा हा आग्रह पाहून जरांगे पाटील यांना आपला पण तोडावा लागला. सर्वांच्या विनंतीचा मान त्यांनी ठेवला. तुमच्या विनंतीचा मी मान ठेवतो. मी पाण्याचा घोट घेतो. पण माझ्या उपोषणावर ठाम राहील. उपोषण सुरूच राहील, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांना पाणी देण्यात आलं. जरांगे पाटील यांनी पाच दिवसानंतर पाण्याचा घोट घेतला.

दुसऱ्यांदा पाणी प्यायले

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना भेटायला छत्रपती संभाजीराजे आले होते. संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याचा आग्रह धरला होता. कोल्हापूरच्या गादीचा मान आणि छत्रपतीच्या घराण्याचा मान म्हणून त्यांनी पाण्याचा घोट घेतला. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या थेंबालाही हात लावला नव्हता. थेट आज समाजाच्या आग्रहास्तव त्यांनी पाणी घेतलं.