मेलो तरी तुम्हाला… सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

सहकाऱ्यांना नोटीस बजावल्याने मनोज जरांगे पाटील संतप्त झाले. सरकार आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. "मेलो तरी शरण जाणार नाही", असा निर्धार करत, मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेलो तरी तुम्हाला... सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 11:52 AM

सावध राहा, सतर्क राहा. रात्र वैऱ्याची आहे. ते षडयंत्र रचत आहेत. काम करणाऱ्यांना अडचणीत आणत आहेत. दबावातून चौकश्या सुरू आहेत. एकजूट राहा. संकटात तोंड देण्याची हिंमत ठेवा. आपलं कोणी नाही. आपले आपणच आहोत, असं सांगतानाच त्यांना तीन महिन्याची वेळ दिली आहे. या तीन महिन्यात मला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. पण तुम्हाला सांगतो, मेलो तरी चालेल. मी त्यांना शरण जाणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते आमचा जेवढा बदला घेतील, तेवढाच आम्हीही बदला घेणार आहोत. मला उघडं पाडण्याचं काम ताकदीने सुरू आहे. माझ्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू आहे. सरकारला तीन महिन्याचा वेळ दिला आहे. त्या काळात मला जेवढं बदनाम करायचं तेवढं करणार आहेत. माझ्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. मला खात्री आहे, मी समाजाला मायबाप म्हटलंय. ते मला कधीच एकटं पडू देणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

वार केल्यावर पेटून उठू

नोटीशी देण्यात आल्या. तो त्रास होणारच. आंदोलनात राहणाऱ्यांना त्रास होणारच आहे. मी यांचे धागेदोरे शोधत आणले आहेत. मी पुराव्याने सांगणार आहे. सरकारने तीन महिने घेतले आहेत. ते आम्हाला या काळात घायळ करणार आहेत. आम्ही घायाळ होणार नाही. तुम्ही वार केल्यावर आम्ही पेटून उठू. तुम्ही कितीही त्रास दिला तरी आम्ही सहन करणार आहोत. आम्ही तुमच्याशी मित्रत्व करणार नाही. तुम्हाला शरण येणार नाही. मेलो तरी चालेल. विजय व्हायचा असेल तर मरण येणारच आहे. मी मराठ्यांना तुमच्या दावणीला बांधणार नाही. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. मी हटणार नाही, असं जरांगे म्हणाले.

तीन महिने शांत राहणार

तुमच्या कुठे कुठे बैठका झाल्या. मुंबईत कुठे बैठका घेतल्या हे मी सांगणार आहे. बैठका घेणं, पदाधिकाऱ्यांना आदेश देणं हे उपमुख्यमंत्र्यांचं काम नाही. तुम्ही राज्यकर्ते आहात. तुमच्या विरोधात कोणत्याही जातीधर्माचे लोक बोलले म्हणून काय झालं? त्यांच्याकडे द्वेषाने न बघता तुम्ही काम केलं पाहिजे. मी मराठ्यांच्या कल्याणासाठी लढत आहे. मला त्रास द्यायचं ठरवलं आहे. माझ्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. मराठ्यांना जिंकून दिल्याशिवाय राहत नाही हे सरकारला माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं. मी तीन महिने काही बोलणार नाही. शांत राहणार आहे. त्यानंतर मी बोलणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

मी आंदोलन करायला तयार

यावेळी अंतरवालीच्या गावकऱ्यांच्या नाराजीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अंतरवालीतील लोकांनी मला किती त्रास दिला तरी मी त्यावर काहीच बोलणार नाही. या गावाने समाजासाठी खूप काही केलं. रक्त सांडलं आहे. हे गाव समाजासाठी लढलं. आपणही गावासाठी लढलो. गावातून कोणी काही बोललं तर त्याकडे लक्ष देऊ नका. आपलेच लोक आहेत. ते बोलल्याने काही फरक पडणार नाही. शेवटी आपलं गाव आहे. आपण त्यांना उत्तर देऊ नये. गैरसमजातून काही गोष्टी घडल्या असतील. आंदोलन अंतरवालीतच व्हावं असं गावकऱ्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी व्यासपीठ लावावं. मी आंदोलन करायला तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us