
संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजी नगरात पार पडत आहे. या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होत असल्याने बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्य सरकारचे सर्वच्या सर्व 29 मंत्री आणि 400 अधिकाऱ्यांचा फौजफाटा औरंगाबादेत अवतरला आहे. या मंत्र्यांचं रेडकार्पेट टाकून स्वागत करण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली असून मंत्र्यांच्या जेवणाच्या एका थाळीवर हजारो रुपये मोजण्यात आले आहेत. या थाळीची किंमत इतकी आहे की त्यात तुमचा काही दिवसांचा खर्च भागेल. त्यामुळे त्यावर टीका केली जात आहे.
सर्वच्या सर्व मंत्र्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. संभाजीनगरातील प्रसिद्ध हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये या मंत्र्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नम्रता कॅटर्सला जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे. जेवणाच्या एका थाळीसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये मोजले जाणार आहेत. या थाळीत सर्वच्या सर्व इंडियन पदार्थ असणार आहेत. तीन स्वीट्ससह सर्व व्हेज पदार्थ या थाळीत असणार आहेत. बैठकीच्या ठिकाणीच या मंत्र्यांना जेवण दिलं जाणार आहे.
मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना सरकारकडून मंत्र्यांच्या जेवणावळीवर करण्यात येणाऱ्या अवाढव्य खर्चावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी ट्विट करून खर्चाचा तपशीलच दिला आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला 1500 रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?, असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव)
अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी)
एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विरोधकांनी मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील मुक्कामावर टीका केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता फाईव्ह स्टार हॉटेलात मुक्काम करणार नाहीते. त्याऐवजी ते सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आदर्श नागरी पतसंस्था घोटाळा झाला होता आणि त्या संदर्भात एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन द्यायचे होते. पण हे निवेदन त्यांनी सचिवांना द्यावे असे सांगण्यात आले. त्याच्या निषेधार्थ एमआयएमकडून काढण्यात येणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त एमआयएमचे कार्यकर्ते आता सिटी चौक पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ही येणार आहेत.