Auranhagand Top 5: औरंगाबाद आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात

| Updated on: Sep 23, 2021 | 1:37 PM

तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयामुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळातील गणितं बदलणार आहेत तर संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे विविध धरण पातळ्यांत वाढ झाली आहे. या व अन्य बातम्या जाणून घ्या टॉप5 मध्ये..

Auranhagand Top 5: औरंगाबाद आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील पाच महत्त्वाच्या बातम्या
Follow us on

1. औरंगाबादेत महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार

22 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता राद्यातील सर्व महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये एका प्रभागात तीन वॉर्ड पद्धतीने निवडणूक (Three member ward Structure in AMC) होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे औरंगाबादेत गेल्या दोन वर्षांपासून आपापल्या वॉर्डात मोर्चेबांधणी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चांगलीच निराशा झाली आहे. आतापर्यंत एक वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने आता महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar)अंतर्गत तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याशिवाय अन्य पर्याय स्थानिक शिवसेना नेत्यांकडे राहिलेला नाही. दरम्यान, या निर्णयामुळे अपक्षांचा घोडेबाजार थांबेल, अपक्षांना रोख लागेल, असे मत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले.

2. हेल्थकेअर पॉलिसीच्या फ्रॉडने औरंगाबादेत खळबळ

हेल्थकेअर पॉलिसीच्या नावाखाली औरंगाबादमधील नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिनॉमिनल हेल्थ केअर असे या कंपनीचे नाव असून या प्रकरणी काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा अध्यक्ष नंदलाल केशरसिंगला लातूर पोलिसांकडून औरंगाबादच्या ताब्यात घेतले आहे. 2005 साली मुंबईत स्थापन झालेल्या या कंपनीच्या शाखा राज्यभरात पसरलेल्या असून औरंगाबादमधील शाखा 2015 मध्ये ज्योती नगरात स्थापन झाली होती. दरमहा 350 रुपये असे 20 महिने पैसे गुंतवल्यानंतर एकूण सात हजार रक्कम होईल. या रकमेचे 9 वर्षानंतर दामदुप्पट होऊन 14 हजार रुपयांचा परतावा घेऊन जाण्याचे अमिष ग्राहकांना दाखवण्यात आले होते. तसेच या नऊ वर्षांच्या काळात सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी मेडिक्लेमची सुविधाही देण्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, या कंपनीत ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

3. मराठवाड्यातील धरणं ओव्हरफ्लो, जायकवडी 75 टक्के भरलं

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबादेतील धरणसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच नाशिक आणि अहमनदनगर परिसरात संततधार सुरु असल्यामुळे येथील धरणांतूनही मोछ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी संध्याकाळी जायकवाडी धरण 75 टक्के भरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच परभणीतील येलदरी धरण, हिंगोलीतील इसापूर धरण, बीडमधील माजलगाव धरणही औव्हर फ्लो झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणाचेही पाच दरवाजे बुधवारी संध्याकाळी उघडण्यात आले. दरम्यान मराठवाड्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

4. वीरभद्र नदीवर पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांच्या जीवावर बेतले

पैठण तालुक्यातील नवगाव येथे वीरभद्र नदीवर पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना 22 सप्टेंबर- बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोहोयला गेलेल्या तरुणांची नावं मनोज काळे आणि कार्तिक काळे अशी आहेत. सध्या मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे चित्र आहे. त्यामुळे गावा-गावातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वीरभद्र नदीचे पात्र किती खोल आहे, याचा अंदाज या दोघांना आला नसावा. दरम्यान, दोघे तरुण बुडत असल्याचे आजुबाजूच्यांनी पाहताच, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला. यातील कार्तिक काळे याला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं. तर मनोज काळे वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहून गेलेल्या तरुणाचा रात्रभर शोध सुरु होता. पण त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

5. विषारी औषधाने 75 शेळ्यांचा तडफडून मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील जेहुर गावात खारीच्या धरण परिसरात अज्ञात समाज कंटकाने गवत पाण्यात विषारी औषध फवारल्यामुळे तब्बल 75 शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धरणाच्या परिसरात काही लोकांनी बेकायदेशीर शेती काढली आहे. आणि परिसराचा कुणीही शेळ्या चारण्यासाठी वापर करू नये म्हणून औषधाची फवारणी केली यामुळे तब्बल 75 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.

इतर बातम्या-

औरंगाबाद महापालिकेत आता तीन सदस्यीय प्रभाग रचना! तगड्या पक्षांचे फावणार, अपक्षांचा कस लागणार

औरंगाबाद महापालिका देतेय QR कोड आधारीत कोव्हिड चाचणी अहवाल, वर्षभरातील 5 लाखांपेक्षा जास्त अहवाल उपलब्ध