नोकरदारांनो, भविष्य निर्वाह निधीची आधार जोडणी त्वरा करा, यापुढे सर्व दावे ऑनलाइनच होणार

| Updated on: Sep 18, 2021 | 6:02 PM

सध्या मराठवाड्यात 2 लाख 31 हजारांच्या घरात कर्मचारी आहेत. यापैकी साडेतीन टक्के म्हणजेच 17,500 कर्मचाऱ्यांची आधार जोडणी झालेली नाही. तर 87 हजार कर्मचाऱ्यांचे बँक खाते जोडलेले नाही.

नोकरदारांनो, भविष्य निर्वाह निधीची आधार जोडणी त्वरा करा, यापुढे सर्व दावे ऑनलाइनच होणार
Follow us on

औरंगाबाद: भविष्य निर्वाह निधीचा दावा करण्यासाठी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र यापुढे कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया स्वतंत्रपणे करता येईल. भविष्य निर्वाह निधीचा दावाही त्यांना स्वतंत्रपणे करता येईल, फक्त त्यासाठी आवश्यक आधार जोडणी करणे आवश्यक असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. हे लिंकिंग लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन, भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. हे लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याकरिता त्वरीत यूएएन-आधार लिंक करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे यासंबंधीची पत्रकार परिषद घेण्यात आली.

मराठवाड्यात 17,500 कर्मचाऱ्यांचीच आधार जोडणी बाकी

भविष्य निर्वाह निधीचा दावा यापुढे प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी आधारची जोडणी आवश्यक आहे. मात्र मराठवाड्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सध्या मराठवाड्यात 2 लाख 31 हजारांच्या घरात कर्मचारी आहेत. यापैकी साडेतीन टक्के म्हणजेच 17,500 कर्मचाऱ्यांची आधार जोडणी झालेली नाही. तर 87 हजार कर्मचाऱ्यांचे बँक खाते जोडलेले नाही. तर मराठवाड्यात सध्या 65 हजार सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, अशी माहिती या पत्रकारपरिषदेत बोलताना क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त जगदिश तांबे यांनी दिली.

ऑनलाइन जोडणीसाठी काय आवश्यक?

कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती किंवा सेवा संपुष्टात आल्यावर हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. यासाठी केंद्र सरकारने अनेक नवे बदल केले आहेत. यामुळे ही रक्कम मिळवणे प्रत्येकासाठी अगदी सोपे झाले आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी यापुढे फक्त ऑनलाइन मिळवता येईल. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन निधी मिळणार नाही. यासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि ओटीपी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ऑनलाइन निधी मिळवण्यासाठी आधार कार्ड, युनिव्हर्सल अकाउंट एकाच मोबाइल क्रमांकाला जोडलेले असणे आवश्यक आहे. ही जोडणी आस्थापना करतील.

वारसदार जोडणीही तितकीच महत्त्वाची

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर परिवाराला भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा यासाठी वारसदार जोडणी आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन आधार कार्डदेखील जोडून घेणे अनिवार्य आहे. मात्र आतापर्यंत फक्त 4 हजार कर्मचाऱ्यांनीच वारसांचे ‘ई-नॉमिनेशन’ करुन घेतले आहे.

6,500 निवृत्तांनी हयातीचे दाखलेच दिले नाहीत

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन मिळण्यासाठी वर्षातून एकदाच हयातीचा दाखला द्यावा लागतो. आपल्या जवळच्याच ई-सेवा केंद्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये यासंबंधीची माहिती अपडेट करावी लागते. मात्र याकडेही अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सुमारे 6,500 निवृत्तांनी हयातीचा दाखलाच दिला नाही, अशी माहितीही तांबे यांनी दिली. याचा फटका निवृत्तांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना निश्चित बसू शकतो, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. ही सेवा अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच कार्यालयाच्या प्रांगणात एक केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या- 

Employee pension scheme : किमान पेन्शन 9000 रुपये वाढणार? 6 सप्टेंबर रोजी ईपीएफओ बोर्ड घेणार निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट