सर्वाधिक प्रेम कुणावर? राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; छगन भुजबळ यांचं उत्तर काय?

| Updated on: Mar 20, 2023 | 7:36 AM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा काल अमृत महोत्सवानिमित्ताने गौरव करण्यात आला. यावेळी भुजबळ यांनी अनेक किस्से ऐकवले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच टोलेबाजीही केली.

सर्वाधिक प्रेम कुणावर? राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; छगन भुजबळ यांचं उत्तर काय?
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांना एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो म्हणजे तुमचं सर्वाधिक प्रेम कुणावर? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? या प्रश्नामुळे अनेक नेत्यांची पंचाईत होते. कारण हे दोन्ही नेते त्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे कुणा एकाचं नाव कसं घ्यायचं अशी अडचण असल्याने काही नेते दोन्ही नेत्यांचं नाव घेतात आणि वेळ मारून नेतात. पण हाच प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारला असता त्यांनी मात्र काहीसं हटके उत्तर दिलं. दोन्ही नेत्यांवर आपलं प्रेम आहे. पण सर्वाधिक प्रेम आणि जवळकी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असं सांगतानाच भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या धीर, संयम आणि नेतृत्व कौशल्याची मुक्तकंठाने स्तुतीही केली.

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी भुजबळ यांची मुलाखत घेतली. तेव्हा बर्दापूरकर यांनी भुजबळ यांना कोंडीत पकडणारा हा प्रश्न विचारला. पण भुजबळ हे कसलेले राजकारणी, त्यांनीही आपल्या खास शैलीत या प्रश्नाचं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांनंतर शिवसेनेला सांभाळलं. भाजपसोबत दोनदा काडीमोड झाला. 2014मध्ये स्वबळावर लढले. अशा परिस्थितीही उद्धव ठाकरे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. हे नाकारता येणार नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेबांकडे तोफखाना होता

बाळासाहेबांकडे त्यावेळी प्रचंड मोठा तोफखाना होता. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, भुजबळ, सुधीर जोशी, नवलकर, दादा कोंडके हा तोफखाना होता. त्यामुळे शिवसेना वाढत गेली. लढत गेली. बाळासाहेब गेले तेव्हा मीही बाहेर पडलेलो होतो. राज ठाकरेही बाहेर पडले होते. नारायण राणेही बाहेर पडले होते. काही मंडळी दिवंगत झालेले होते. अशा परिस्थितीत नवीन कार्यकर्ते आणि नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल माझं अधिक प्रेम आहे. अर्थात राज ठाकरे यांच्याबद्दलही प्रेम आहेच. या दोघांनाही लहानपणापासून मी पाहत आलोय, असंही त्यांनी सांगितलं.

एखाद्याने अंथरूण धरलं असतं…

पक्षाचं नाव गेलं, निशाणी गेली असं असताना ज्या धैर्याने ते उभे राहतात, बोलतात… त्यामुळे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक जणांकडून काही तरी घेण्यासारखं असतं. सर्वस्व गमावल्यावरही एक व्यक्ती उभा राहते. आणि हजारो, लाखोंच्या सभेसमोर बोलते ही सोपी गोष्ट नाही. एखादा मनुष्य ताबडतोब अंथरूण धरेल. पण ते उभे राहतात. हीच तर खरी कसोटी आहे एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वाची, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली.

विलासराव म्हणाले, चला पुढे

यावेळी भुजबळ यांनी आपण सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. पण सर्वाधिक स्वातंत्र्य विलासराव देशमुख यांच्या काळात मिळाल्याचं सांगितलं. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा किस्साही त्यांनी ऐकवला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी उपमुख्यमंत्री होतो. गृहमंत्रीही होतो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली पाहिजे असा पोलिसांचा रिपोर्ट आला. तेव्हा मी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. विलासरावांना सांगितलं नाही. त्यांना ही बातमी टीव्हीवरून कळाली. ते म्हणाले तुम्ही निर्णय घेतला आहे. चला पुढे, असं भुजबळ यांनी सांगितलं.

विलासरावांनी स्वातंत्र्य दिलं

त्याचप्रमाणे भरत शाह नावाचे हिऱ्यांचे व्यापारी होते. त्यांचा दाऊद बरोबर संबंध होता. ते बॉलिवूडमध्ये काम करायचे. तेव्हा बॉलिवूडमधील लोकांना गँगस्टरकडून त्रास व्हायचा. तेव्हा हे लोक बॉलिवूडच्या लोकांना त्रास द्यायचे. दाऊदला सांगून कुणाला किती फायदा झाला ते सांगायचे. त्यामुळे दाऊद त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा आणि हे लोक मग मध्यस्थ म्हणून यायचे. हे फोन टॅप वगैरे करून माहिती मिळाली होती. बालचंद्रन नावाचे आमचे ज्वॉईंट सीपी होते आणि एमएन सिंग हे आयुक्त होते.

त्यांनी मला कोण दाऊदबरोबर कसं बोलतात हे ऐकवलं. भरत शाह वगैरे परदेशात गेले होते. त्यानंतर एक दिवस त्यांना बोलावलं. 2 वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली. त्यानंतर 3 वाजता कोर्टात हजर केलं. कोर्टात सांगितलं भरत शाह यांना मोक्का खाली अटक करतोय. तेव्हा भरत शाहला मोक्का लावल्याची बातमी फुटली. हे सुद्धा विलासरावांना माहीत नव्हतं. तेव्हाही ते म्हणाले, ठिक आहे. भुजबळ तुम्ही निर्णय घेतला. विचारपूर्वक घेतला असेल. मी तुमच्याबरोबर आहे. ते जे स्वातंत्र्य आहे, ते मी विलासरावांसोबत अनुभवलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चव्हाण माझे बॉस

मला त्यावेळी पॉवर्स होत्या. गृहविभागाच्या पॉवर्स होत्या. मी राष्ट्रवादीचा पहिला अध्यक्ष होतो. ती शक्तीही माझ्या हातात होती. स्टेटस थोडा वाढलेला होता. त्यामुळे आम्ही पण सुस्साट होतो. विलासराव मोकळ्या मनाचे आणि दिलदार मनाचे होते, असं सांगतानाच मी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणत नाही. त्यांना हाऊ आर यू माय बॉस असंच म्हणायचो. आजही मी त्यांना माझे बॉसच समजतो. विचारा त्यांना. वन्स बॉस अलवेज बॉस, असं भुजबळ यांनी म्हणताच एकच हशा पिकला.