मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीची चिन्हे; तीन बड्या नेत्यांमध्ये चर्चा

Third front Vidhansabha Eletion 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात चर्चा होतेय ती विधानसभा निवडणुकीची.... याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी... विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीची चिन्हे; तीन बड्या नेत्यांमध्ये चर्चा
रविकांत तुपकर, बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: Facebook
| Updated on: Jul 09, 2024 | 1:59 PM

विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीशिवायच्या तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तशी बैठक लवकरच होणार आहे. आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली आहे. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबतचं भाष्य केलं आहे. त्यामुळे जर विधानसभेच्या निवडणुकीआधी ही तिसरी आघाडी झाली, तर यंदाची विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

तीन नेत्यांमध्ये आघाडीबाबत चर्चा

आमदार बच्चू कडू, रविकांत तुपकर आणि संभाजीराजे यांच्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्ही आग्रही आहोत. जर गरज पडली तर त्यासाठी तिसरी आघाडी करू, असं बच्चू कडू म्हणालेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामन्यांच्या समस्या, सध्या पक्ष फोडाफोडीचे झालेले प्रयोग आणि यामुळे बदललेली महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती… या सगळ्यामुळे राज्यात नवी तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात याबाबतची प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच याबाबतची बैठक होणार आहे. काल पुण्यात स्वराज्य संघटनेचं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडलं. या कार्यक्रमाला बच्चू कडू उपस्थित होते. यावेळीदेखील या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली असू शकते.

बच्चू कडूंनी काय म्हटलं?

आम्ही रविकांत तुपकर यांची भेट घेतली आहे. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबतही आमची बैठक होणार आहे. तिसऱ्या आघाडीचा आम्ही विचार करत आहोत. तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आम्ही 15 ते 17 जागा या विधानसभेमध्ये लढवू आणि त्या जिंकू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय.

रविकांत तुपकर काय म्हणाले?

राज्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर तिसरी आघाडी तयार करण्याची आमची तयारी आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली. बच्चू कडू यांची संभाजी महाराज यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकरी हा आमचा केंद्र बिंदू असेल. शेतकऱ्यांशी संबंधित संगठना सोबत आमची चर्चा सुरू आहे. प्रस्थापित पक्षाला शेतकरी आणि जनता कंटाळली आहे. तिसरी आघाडी 100 टक्के यशस्वी होईल आणि आम्ही ते करून दाखवू, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

तिसऱ्या आघाडीची शक्यता किती?

राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. पण आगामी निवडणुकीत मात्र तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. मध्यंतरी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विविध भागात दौरा केला होता. संभाजीराजे यांच्याशी तरूणवर्ग मोठ्या प्रमाणत जोडलेला आहे. रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आग्रही असतात. त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. शिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली होती. तर बच्चू कडू हे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. या शिवाय दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी ते आवाज उठवतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जर हे तीन नेते एकत्र आले तर आगामी निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल. शिवाय आघाडी आणि युतीतील नाराज लहान पक्ष आणि संघटना या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात.