2019मध्ये उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला, आता आमच्यासोबतही… बच्चू कडू यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदे यांना 2029 साली मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही मेहनत करू, असे बच्चू कडू म्हणाले. यासाठी राज्यभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2019 मध्ये झालेल्या "दगाफटक्या"चा उल्लेख करत महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि शिवसेनेला डावलण्यावर त्यांनी तीव्र इशारा दिला. कडूंचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

2019मध्ये उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला, आता आमच्यासोबतही... बच्चू कडू यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
बच्चू कडू
| Updated on: Jun 08, 2026 | 12:11 PM

शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता ते सत्तेत सहभागी असून वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गुणगान करतात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य करताना दिसतात. आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छाही कडू यांनी व्यक्त केली. 2029 मध्ये त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यासाठी आम्ही राज्य पिंजून काढू, असंही बच्चू कडू म्हणाले.  माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?

आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा आहे. आमच्या मनातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हेच आहेच. 2029 साली त्यांना (शिंदे) मुख्यमंत्री करायचं आहे, त्यासाठी आम्ही राज्य पिंजून काढू असं कडू म्हणाले. सध्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, देवा भाऊंचं प्रमोशन व्हावं अशी इच्छाही कडू यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत एक विदान केलं. ‘2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला होता. त्यामुळे दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, तर आम्हीही तयारी करत आहोत’ असं बच्चू कडू म्हणाले.

ही सेना आहे, कधीही थांबत नाही, कोणीही चुकूनही डावलण्याचा प्रयत्न केला

दरम्यान राज्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. मात्र त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होते, अशी चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात शिंदेंना डावलल्याने महायुतीत नाराजी पसरल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला डावललं जात आहे का, असा सवाल बच्चू कडू यांना विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. डावलून शिवसेना थांबणार नाही, ही सेना आहे आणि सेना कधी थांबत नसते.. त्यामुळे कोणीही चुकूनही डावलण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात तसे दिवस दिसल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

 

Follow Us