
मुंबई : राज्यात यंदा एकादशी आणि ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही दिवशी राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहविभागाला निर्देश देतानाच काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रातील सण, उत्सवात कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. सर्वधर्मीय बांधव नेहमीच सर्व सण उत्सव एकत्र येऊन साजरे करतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीप्रमाणेच ईदमध्येही गृह विभागाने नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाला केल्या आहेत.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्व धर्मियांची आहे. शांतता आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांबाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. तसेच, पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कुर्बानीसाठी आणणाऱ्या जनावरांना फार्म हाऊसमध्ये ठेऊन त्यांच्या चाऱ्यापाण्याच्या व्यवस्थेसाठी पूर्वीच्या सरकारने अडीच हजार रुपये आकारणाचा निर्णय घेतला होता. तो रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
मुस्लिम बांधवाच्या वतीने आमदार सिद्दीकी यांनी यंदा ईद व एकादशी एकाच दिवशी आली आहे. मात्र, मुस्लिम बांधवांनी अशा प्रकारे एकाच दिवशी आलेल्या अनेक सणांच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केल्याचे सांगितले. तर, सपाचे आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख यांनी बाजार समित्यांबाहेर बकरी विक्रीस परवानगी दिल्याबद्दल आणि पशूवैद्यकीय तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरवर्षीप्रमाणेच गृह विभाग या सणासाठी नियोजन करतील. आवश्यक ती दक्षता घेतील. या सणापूर्वी तीन-चार दिवस आधी पशूंची वाहतूक सुरु होते. त्यामध्ये काही अनधिकृत घटक अडथळा आणत असतील तर त्याबाबत पोलीस दक्षता घेतील. यापुर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष दिले जाईल अशी ग्वाही दिली.