सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, पत्रात नेमकं काय?
बीड जिल्ह्याच्या राजकारणात निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस प्रज्ञा खोसरे यांच्यापासून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रातील गंभीर आरोपांवर प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रानंतर प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच संबंधितांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रात नेमकं काय?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पत्रात प्रज्ञा खोसरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्या महिलांना त्याच्याकडे नेण्याचे काम करतात. प्रज्ञा खोसरे यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला असून, त्याबाबत बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे २००९ मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, त्यांनी स्वतः ४-५ वेळा गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा आणि बीड जिल्ह्यातील इतर महिलांनाही पुत्रप्राप्तीसाठी किंवा गर्भलिंग निदानासाठी विविध डॉक्टरांकडे नेल्याचा खळबळजनक आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.
तसेच प्रज्ञा खोसरे यांनी रूपाली चाकणकर यांच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद मिळवले आहे. त्या भोंदू बाबा अशोक खरातच्या हस्तक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे राज्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि सामाजिक प्रतिष्ठेस मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे त्यांना तातडीने सर्व पदांवरून हटवण्यात यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
प्रज्ञा खोसरे यांचे प्रत्युत्तर
या आरोपांनंतर प्रज्ञा खोसरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ निनावी पत्र व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे. मी अशोक खरातचा जाहीर निषेध करते आणि त्याला कडक शिक्षा व्हायला हवी, हीच माझी भूमिका आहे. काही लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन खालच्या दर्जाची टीका करत आहेत, असे प्रज्ञा खोसरे यांनी म्हटले.
दादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींना आम्ही आमचे सर्वस्व मानतो. त्यांच्या शब्दावर आणि पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करत आहोत. अशा परिस्थितीत त्यांच्यापासून धोका असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. या निनावी पत्रामुळे केवळ त्यांचीच नव्हे तर बीड जिल्ह्याची आणि महिलांची बदनामी होत आहे. ज्यांनी कोणी हे कारस्थान रचले आहे, त्यांच्या विरोधात मी लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. आता या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच यामागे नेमके कोणाचे डोके आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.