जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो; तरुणावर सपासप वार, पुन्हा बीड हादरलं!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणावर कत्तीने सपासप वार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...

जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो; तरुणावर सपासप वार, पुन्हा बीड हादरलं!
बीड
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 14, 2026 | 1:23 PM

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा येथे गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला भावाच्या बाराव्यासाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका मिळाली होती. त्याच्या गावी येण्याच्या एक दिवस आधीच, त्याच्या नावाचा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत पाच जणांच्या टोळीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याने पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे.

घटनेचा तपशील

तांबवा येथील नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे (वय अंदाजे २५) हा तरुण आपला मित्र आदित्य बडे याच्यासह दुचाकीवर शेताकडे जात होता. संशयितांनी त्याचा पाठलाग केला आणि वाटेतच दुचाकी अडवली. दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेकर या पाच जणांनी तरुणाला घेरले.

आरोपींनी प्रथम संग्राम चाटेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, त्यानंतर लोखंडी रॉड आणि कत्तीने सपासप वार केले. हल्ल्यादरम्यान तो ओरडत होता, “तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे १३१३ तुला दाखवतो! तुला आज जिवंत सोडणार नाही!” असे धमकीपूर्ण उद्गार काढले. या हल्ल्यात संग्राम चाटे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाचही संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न (कलम १०९) आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि जलद कारवाई

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे याला १४ महिन्यांनंतर भावाच्या बाराव्यासाठी न्यायालयाने विशेष परवानगी दिली होती. शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास १० सशस्त्र कमांडो आणि स्थानिक पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला बीड कारागृहातून तांबवा गावी आणण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मस्साजोग (हत्या प्रकरणाशी संबंधित गाव) मार्ग टाळला आणि धारूर मार्गे पर्यायी रस्त्याने त्याला नेले-आणले. सुरुवातीला सात तासांची परवानगी असली तरी, परिसरातील तणाव आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी त्याला फक्त दोन तास (दुपारी १:२२ वाजेपर्यंत) गावात थांबू दिले आणि तात्काळ परत कारागृहात दाखल केले. या घटनेमुळे तांबवा आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना संतोष देशमुख हत्याकांडातील गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

Follow Us