
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि विविध तपास यंत्रणांवर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरही अनेक आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. तसेच काही आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटबद्दल भाष्य केले आहे. “२८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते, परंतु वाल्मिक कराडची मालमत्ता अजूनही जप्त करण्यात आलेली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु आहे. तसेच वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील” अशी शक्यता अंजली दमानिया यांनी वर्तवली.
“संतोष देशमुख प्रकरणी अजूनही फरार कृष्णा आंधळेला अटक झालेली नाही. त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत. जेव्हा मी त्यांच्या अनेक प्रकरणाच्या माहिती घेत होते, तेव्हा माझ्या कानावर असा आला होता कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहे. प्रत्येक जेलमध्ये सुद्धा पैशाची मागणी केली जात आहे”, असेही अंजली दमानियांनी म्हटले.
“आज सुरेश काही असा आरोप केला आहे की 300 कोटीच्या मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती. आता त्याच्यापुढे पण अनेक खुलासे होतील. हेच नाही तर गण लायसन्स प्रकरणात पण सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.