
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आता मोर्चाचं हे वादळ मुंबईत धडकलं आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा मोर्चात सामील होण्यासाठी मुंबईत आले आहेत. यावेळी सुरेश धस यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. तसेच एका प्रसिद्ध वकिलाचा उल्लेख टॉम अँड जेरी असा केला.
भाजपचे आमदार सुरेश धस हे आता मीच मराठ्यांचा मोठा नेता आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलं आहे, असा चिमटा सुरेश धस यांनी काढला आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.
हा मोर्चा नाही, पब्लिक क्राय
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. त्यात सुरेश धस समील होत आहे. त्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी गावाकडून आलोय. मला यायला साडे सहा सात तास लागले. शेकडो लोक या मोर्चात सामील झाले आहे. हा फक्त मोर्चा नाही. हा पब्लिक क्राय आहे. केवळ आरोपींना अटक केली म्हणजे झालं असं होत नाही. तर या लोकांना फाशी द्यावी ही मागणी आहे. इतका भयंकर मर्डर कधी झाला नाही. हा आक्रोश आहे. लोक राग व्यक्त करण्यासाठी आले आहेत. संतोष देशमुख कुटुंबाला बोलावल्यावर ते येतात. ही राजधानी आहे. मी या प्रश्नाची सुरुवात केली. मीही मुंबईकरांसोबत आहे. आज आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही बोलणार आणि आमच्या व्यथा मांडणारच, असं सुरेश धस म्हणाले.
फाशी शिवाय दुसरा मार्गच नाही
फाशी शिवाय दुसरा मार्गच नाही. हे लोक फाशीच गेले पाहिजे. यातील कोणही सुटता कामा नये. त्यांना लवकरात लवकर शिक्षा सुनावली गेली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली गेली पाहिजे. या लोकांना फाशी दिली तर असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. गुन्हेगारांमध्ये दहशत राहील, असंही त्यांनी सांगितलं.
बहुतेक मर्डर राजकीय
अनेक हत्यांवर मी भाष्य करत आहे. महादेव मुंडेंची हत्या झाली, त्यावर मी बोललो. संदीप दिघोळेचं काढतोय. तिकडे फड गेला आहे. अनेक लोकांच्या मर्डर झाल्या आहेत. त्यांचा उल्लेख करणं पाप आहे का? बहुतेक मर्डर राजकीय आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व प्रकरणं बाहेर काढणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.