
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्याला आता अडीच महिने लोटले. आरोपी आणि पोलिसांचे लागेबंध पूर्वीपासूनच उघड झाले आहेत. या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी आणि केस कमकुवत करण्यासाठी जीवाचे रान करत असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केला आहे. तर आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीड पोलीस सरकारचा पगार घेऊन कुणाच्या हमाल्या करत आहेत, हे समोर आल्याने सरकार तरी कारवाई करणार का असा संतप्त सवाल मोर्चकरी करत आहेत.
पोलिसच आरोपींच्या दिमतीत
याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर दलावर गंभीर आरोप केला आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी सुद्धा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धनंजय देशमुख यांच्या आरोपानुसार, कृष्णा आंधळेवर पोलिसांनी कारवाई केली नाही. सीआयडीकडे तपास दिल्यावर केज पोलिसांनी काहीच मदत केली नाही. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम पुढे आली आहे.
जे स्वतः आरोपी आहेत तेच आरोपीना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. 6 तारखेला ऍट्रॉसिटी दाखल केली नाही. खून झाल्यावर 12 तारखेला दाखल केली. त्यामुळे जर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना घडली नसती, असे ते म्हणाले.
स्थानिक पोलिसांवर भरवसा नाय
एसपी चांगले काम करत आहेत. पण खालचे पोलीस कर्मचारी आरोपीच्या बाजूने आहेत. स्थानिक पोलीस तपासात काहीही मदत करत नाहीत. लोकांकडून याबाबतचे पुरावे आले आहेत. मात्र पोलिसांकडून काहीही पुरावे दिले गेले नाही. PI महाजन यांना बीड मुख्यालय येथे बदली केलेली असताना ते केज पोलीस स्टेशनला कसे येऊन बसतात, असा सवाल ही धनंजय देशमुख यांनी केला.
महाजनांवर गंभीर आरोप
PI महाजन यांच्याविरोधात गावकऱ्यांचा संताप समोर आला. त्यांनी घटनेच्या दिवशी गावकऱ्यांची दिशाभूल केली, वेगवेगळे लोकेशन सांगितले, महाजन यांना वाटलं होतं गावकरी आरोपींना मारतील. आमच्यापेक्षा आरोपींची काळजी महाजनला होती असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. 6 तारखेला महाराजांनी खंडणी आणि ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर ही घटना घडत नसती असे गावकरी म्हणाले.
अशोक सोनवणे बारा तास पोलीस स्टेशन मध्ये होता त्याचे तक्रार घेतली नाही ती तक्रार उशीरा घेतली. विष्णू साठे याच्या ऑफिस मध्ये आरोपी सोबत PSI पाटील होते, कृष्णा आंधळे फरार आरोपी पाटीलला दिसला नाही का, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.
PSI पाटील वाल्मीक कराडला भेटायला गेला होता का ? PI महाजन केज पोलीस ठाण्यात कशाला येतो, आम्ही PI पाटील साहेबाला सांगितलं तुम्ही याला पोलीस मध्ये कशाला येऊ देता अशा प्रश्नाच्या फैरी गावकऱ्यांनी झाडल्या. या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. हात वर करू गावकऱ्यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला.