Jitendra Avhad : बीडमधून कलेक्टरचं गायब; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट, राज्यात एकच खळबळ

Jitendra Avhad Big Statement : संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. त्यावेळी अनेकांनी दमदार भाषणं केली. बीड जिल्ह्यातील अराजकतेवर आसूड ओढले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधून कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला.

Jitendra Avhad : बीडमधून कलेक्टरचं गायब; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट, राज्यात एकच खळबळ
जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Dec 28, 2024 | 3:41 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. अनेकांनी बीडमधील बंदुकशाही, धाकटशाही, खंडणी, दहशत, राजकीय गुन्हेगारी यावर आसूड ओढला. अनेकांनी वाल्मिक कराड याला अटक न झाल्याने संताप व्यक्त केला. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या राजीनाम्याचा सूर आळवला. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा पण अनेकांनी समाचार घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधून कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली.

आव्हाडांचा मोठा गौफ्यस्फोट

भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी पोक्षे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा यावेळी दाखला दिला. त्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती त्यांनी सांगितली. बीडमध्ये असताना तिथे नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. पण एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरं काय माहीत नाही. पण या अधिकार्‍याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. एक कलेक्टर इथून गायब झाले ते परत कधीच दिसले नाही. याची शासन दरबारी काहीच नोंद नाही, असा आरोप पण त्यांनी केला.

चौकशीचे नाटक करू नका

यावेळी आव्हाडांनी राज्य सरकारला पण चांगलेच सुनावले. उद्या मुंबईत बसून धनु भाऊंनी फोन केला तर हा अधिकारी जाणार की नाही. मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. डोळ्याने इशारा केला तर संपली चौकशी, असा आरोप त्यांनी केला. असे होत असेल तर संतोष मर्डर प्रकरणाची चौकशी करू नका. संतोषच्या पत्नीला आणि मुलीला आशा दाखवू नका. चौकशी करण्याचं नाटक करून चौकशीच करायची नाही असं करू नका. त्यांचा अपेक्षाभंग करू नका, असा इशारा त्यांनी दिला.

ज्यांना मारले त्यातील अनेक जण वंजारी समाजाचे होते. त्यांनी कुणालाच सोडलं नाही. ज्या पद्धतीने मारलं. समोरचा माणूस व्हिडीओ बघतोय मर्डर कसा होतो. हा क्रूरकर्मा आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली, असे वाल्मिक कराड यांचे नाव न घेता ते म्हणाले. सुषमा अंधारे यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यांनी कुणालाच सोडलं नाही. दारूपासून सर्व धंदे त्यांचे आहेत. पण एक माणूसही बोलायला तयार नाही, असे ते म्हणाले.