
Pankaja Munde Big Statement: राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भायाळा (Bhayala Beed) गावात आयोजित नारळी सप्ताहात त्यांनी हभप होणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले. गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत त्यांनी मोठे भावनिक आवाहनही केले. काय म्हणाले पंकजा मुंडे?
गोपीनाथ मुंडे हे नाव विसरू देणार नाही
भायाळा गावात नारळी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीराम नवमी उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा पराभवानंतर काही लोकांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम भावांनी आपल्यावर केल्याचे त्या म्हणाल्या. तर भगवान गडावर माऊली मंदिराची उभारणी सुरू आहे. या मंदिराला सढळ हाताने कोट्यवधींची मदत करणाऱ्या देणगीदारांची पंकजा मुंडे यांनी पदराने दृष्ट काढली.
तर या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील नारळी सप्ताहात घातली.
परळीत रामराज्य यावे
ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने आदर्श राज्यकारभार केला. तसेच रामराज्य हे परळीतही यावे, हीच माझी प्रभू चरणी प्रार्थना असल्याचे मुंडे म्हणाल्या. रामनवमीचा सण आपल्याला सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. परळीतील काळाराम मंदिराला मोठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सालाबादाप्रमाणे रामनवमीनिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पाळणा हलवून प्रभू श्रीरामाला नमस्कार केला, अभिवादन केले.